Maharashtra Corona Cases Update | राज्यात आज कोरोना रुग्णवाढीला ब्रेक; तरीही आकडा मोठाच
गेल्या महिनाभरापासून सातत्याने होणाऱ्या कोरोना संक्रमित रुग्णवाढीला आज मोठा ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले. आज तब्बल 6 हजारने घट झाली आहे.
मुंबई : गेल्या महिनाभरापासून सातत्याने होणाऱ्या रुग्णवाढीला आज काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले. मात्र, तरीही आज मोठ्या प्रमाणात नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज 24 हजार 645 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2234330 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 215241 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
गेल्या महिनाभरापासून सातत्याने सातत्याने होणाऱ्या कोरोना संक्रमित रुग्णवाढीला आज मोठा ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले. काल (रविवारी) राज्यात 30 हजार 535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. यात आज तब्बल 6 हजारने घट झाली. आज 24 हजार 645 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. कालपेक्षा आज घट झाली असली तरी ही संख्या काही कमी नाही.
पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक : टोपे
कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. कोरोना बाधित रुग्णसंख्येचा राज्यात रोज विक्रमी आकडा समोर येत आहे. यात विशेषकरुन मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात आज 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षण विरहित आहेत. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन/अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही टोपे यांनी सांगितले. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे.
..तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही : टोपे
मुख्यमंत्र्यांसोबत काल बोलणं झालं. जर कोरोना रुग्ण वाढत असतील तर काही शहरात लॉकडाऊन लावावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणण आहे. परिस्थिती बिघडली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल. लॉकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली 80 टक्के असेल तर इतर ठिकाणी 200 टक्के असल्याचे टोपेंनी सांगितले. खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुगांसाठी 80 टक्के खाटा ठेवण्यात येतील. डॅश बोर्ड नियमितपणे अपडेट केला जाईल. रुग्णाला उपचार मिळेल याला प्राधान्य असेल.