शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, राज्यभर काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राज्यात आज काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाला वर्ध्यातून सुरुवात झाली.
वर्धा : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन करत आहे. मोदी सरकारनं तीन नवे कृषी कायदे तयार केले आहेत. या काद्यांना काँग्रेससह देशातील काही शेतकरी संघटना विरोध करत आहेत. 'एक देश, एक बाजारसमीती' या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचं हे कायदे असल्याचं सरकारचं म्हणणं असून या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल, असं सरकारच्या वतीने सरकारचा दावा आहे. या कायद्यांमुळे कृषी क्षेत्रही भांडवलदारांच्या किंवा कॉर्पोरेट कुटुंबाच्या हातात जाईल, आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसेल, असं विरोधक म्हणत आहेत. याच मुद्द्यावरून आज काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
वर्ध्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं सत्याग्रह आंदोलन
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात वर्ध्यामध्ये आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात आज सेवाग्राम येथे कॉंग्रेसच राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस इत्यादी नेते उपस्थिती आहेत.
पाहा व्हिडीओ : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचं आज राज्यव्यापी आंदोलन
सांगलीत काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन
सांगलीत काँगेस भवनसमोर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन सुरू. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, काँगेसचे युवा नेते विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.
नांदेडमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसकडून 'किसान अधिकार दिवस' साजरा
नांदेड येथे केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात किसान अधिकार दिवस पाळला जातो आहे. यानिमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली असून ते ट्रॅक्टरवर बसून आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. त्यानंतर सत्याग्रह देखील करण्यात आला.