Maharashtra Congress : काँग्रेसचे दिग्गज नेते करणार दुष्काळी भागाची पाहणी; विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन
Congress On Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहता आता काँग्रेस पक्षातील दिग्गज काँग्रेस नेते राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Congress On Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहता आता काँग्रेस (Congress) पक्ष प्रत्यक्षपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. राज्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेते राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी (Water Crisis) करणार आहे. सोबतच सरकारकडून काय उपाय योजना केल्या जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आहे. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे मराठवाड्यासाठीच्या दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. तर विदर्भातील नागपूर विभागासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay waddetiwar) यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती असेल. तर अमरावती विभागासाठी आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या नेतृत्वातील समिती पाहणी करणार आहे.
उत्तर महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुष्काळ पाहणी समितीची अध्यक्ष असतील. तर पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती काम करेल. सोबतच कोकण विभागासाठी नसीम खान यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता काँग्रेस प्रत्यक्ष मैदानात उतरून या भागांची पाहणी करणार आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते करणार दुष्काळी भागाची पाहणी
राज्यात मे महिन्याचा शेवटला तळपणारा सूर्य मी म्हणू लागलाय. साठवलेल्या पाण्याची वाफ आभाळाकडे धावतेय आणि आभाळ मात्र उन्हाच्या झळा देतंय. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जमिनी भेगाळल्यात, पिकं करपलीयेत अन् पाणीसाठा घटतोय. तर चिंता दिवसागणिक वाढू लागलीय. राज्यावरील दुष्काळाच्या छायेने काळजामधील काळजीत भर घातलीय. राज्यातील बहुतांश भागात हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. तर अनेक मोठ्या धारणांनी तळ गाठल्यामुळे आता केवळ टँकरचा शेवटचा सहारा नागरिकांना उरला आहे. राज्यात ही विदारक परिस्थिती असताना या दुष्काळी परिस्थितीवरुन राजकारण देखील तापू लागले आहे.
विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन
अशातच, काँग्रेस नेते राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांच्या निर्देशानुसार आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेवरून राज्यात विभागवार जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या समितीत राज्यातील प्रमुख नेते, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी यांचाही समावेश आहे. ही समिती दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर या संदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदनही देण्यात येणार असून प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल देखील सादर करणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या