मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पहिल्यांदाच 'उद्धव ठाकरे गट'उल्लेख, ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाबद्दल शिवसैनिकांचे अभिनंदन
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उल्लेख 'उद्धव ठाकरे गट' केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांच्या या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
मुंबई : राज्यातील 271 ग्रामपंचायतीचे (Gram Panchayat Election) निकाल काल जाहीर झाले. यामध्ये राज्यात भाजपला सर्वात जास्त म्हणजे 82 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला. तर त्या खालोखाल शिवसेनेला 67 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवता आला. यातील 40 ठिकाणचा शिवसेनेचा विजय हा बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघातील आहे. तर बंडखोरी न केलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील 27 ग्रामपंचायींमध्ये शिवसेनेचा विजय झाला आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या विजयाबद्दल शिवसैनिकांचे अभिनंदन केले आहे. परंतु, हे अभिनंदन करत असताना त्यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) असा उल्लेख केला आहे.
"राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपा युती सरकारला जनतेचा कौल. शिवसेना - भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना - भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. परंतु, या ट्विटसोबतच त्यांनी एक बॅनर शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याचा उल्लेक केलाय. या बॅनरवर शिवसेनेला 40 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचे म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे गटाला 27 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचे म्हटले आहे. परंतु, हे सांगत असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमच उद्धव ठाकरे गट असा उल्लेख केलाय.
ट्विटमध्ये काय म्हटले आहे?
राज्यातील 271 ग्रामपंचायतींचा निकाल
भाजपा - 82
शिवसेना -40
उद्धव ठाकरे गट - 27
राष्ट्रवादी काँग्रेस - 53
काँग्रेस - 22
इतर - 47
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपा युती सरकारला जनतेचा कौल...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022
शिवसेना - भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना - भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार... pic.twitter.com/2Y72CAFuSy
दरम्यान, या पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला होता. परंतु, आता ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत ट्वीट केलय.
पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमधील पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत. शिवाय शिवसेनेच्या धनुष्यबान हे चिन्ह देखील आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उल्लेख 'उद्धव ठाकरे गट' केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांच्या या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.