Chandrakant Patil: हरवलेल्या पदवी प्रमाणपत्राची प्रत चंद्रकांत पाटलांना मिळाली चक्क एका दिवसात, मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा युवा सेनेचा आरोप
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदाचा गैरवापर करून आपल्या हरवलेल्या पदवी प्रमाणपत्राची प्रत मुंबई विद्यापीठातून एका दिवसात मिळवल्याचा आणि संपूर्ण प्रक्रिया डावल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.
मुंबई : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chanrakant Patil) यांनी विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या युवासेनेनं केला आहे.. चंद्रकांत पाटलांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन अर्ज करत एका दिवसात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे याविरोधात आता युवासेना आक्रमक झाली आहे.
चंद्रकांत दादा पाटील यांच्या मागच्या अडचणी संपता संपत नाहीत. बाबरी मशीद संदर्भात बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील अडचणीत सापडले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदाचा गैरवापर करून आपल्या हरवलेल्या पदवी प्रमाणपत्राची प्रत मुंबई विद्यापीठातून एका दिवसात मिळवल्याचा आणि संपूर्ण प्रक्रिया डावल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.
युवासेनेच्या आरोपानुसार मुंबई विद्यापीठाच्या संलग्न असलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाची चंद्रकांत दादा पाटील यांना 1980 चे पदवी प्रमाणपत्र हे त्यांना 1987 साली मिळालं होतं. हे पदवी प्रमाणपत्र हरवल्याने त्यांनी मुंबई विद्यापीठात 23 मार्च रोजी आपल्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने ऑफलाईन अर्ज केला. खरंतर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद केलेली असताना सुद्धा मंत्री महोदयांचा अर्ज मुंबई विद्यापीठाने स्वीकारला. त्याच दिवशी त्यांनी पदवी गहाळ झाल्याची एफ आय आर कॉपी सुद्धा त्यात जोडली आणि याच 23 मार्चला त्यांनी आपली पदवी प्रमाणपत्राची प्रत सुद्धा मिळवली. त्यामुळे दबाव टाकून एका दिवसात पदवी प्रमाणपत्राची प्रत मिळवल्याचा युवा सेनेचा आरोप आहे. चंद्रकांत पाटील यांच्या राजीनामाची मागणी युवा सेनेकडून केली जात आहे.
या सगळ्या प्रकरणांमध्ये युवासेनेकडे सर्व कागदपत्र असल्याचं सांगितलं आहे. या संदर्भात मुंबई विद्यापीठ सर्व गोष्टी तपासून या संदर्भात स्पष्टीकरण देईल असं म्हटलं आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यापीठात पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे अर्ज करतो तेव्हा एक तर तो ऑनलाइन अर्ज करावा लागतो आणि शिवाय अर्ज केल्यानंतर किमान महिन्याभरात त्याला ते पदवी प्रमाणपत्र हातात मिळतं. नाहीतर कधी त्याला या कामासाठी हेलपाटे मारावे लागतात. मात्र इथे जर एका दिवसात मंत्र्यांना पदवी प्रमाणपत्र मिळत असेल तर युवा सेनेच्या या तक्रारीनंतर एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे मंत्र्यांना असे कागदपत्र मिळवण्यासाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी म्हटलंय की, मुंबई विद्यापीठाने हे मान्य केले की चंद्रकांत पाटील यांना एका दिवसात पदवी प्रमाणपत्र दिलं. मात्र चंद्रकांत पाटील यांनी प्रक्रिया पूर्ण न करता हे प्रमाणपत्र दिले हे या स्पष्टीकरण स्पष्ट दिसत आहे. कारण 2019 च्या मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकांनुसार कुठल्याही विद्यार्थ्याला पदवी प्रमाणपत्र हवं असेल तर त्याला वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. मात्र इथे अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करून एका दिवसात पदवी प्रमाणपत्र मिळवलं आहे. या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्यामुळे विद्यापीठाचे स्पष्टीकरण साफ चुकीचं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :