एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Milk Protest : टँकर रोखले, दूध रस्त्यावर... दूध दरवाढीसाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन
दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत.
Maharashtra Milk Protest : दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. काही ठिकाणी दुधाचे टँकर रोखत हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले तर काही ठिकाणी गाईला दुधाने आंघोळ घालण्यात आली. तर काही ठिकाणी रास्ता रोको केला गेला तर काही ठिकाणी सरकारचा निषेध म्हणून दगडाला अभिषेक घातला.
उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी किती वेळा दिल्लीला गेले- चंद्रकांत पाटील
मावळ येथील पुणे जिल्हा सहकारी दूध संघासमोर झालेल्या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. लॉकडाऊनच्या काळात सरकारने शेतकऱ्यांनाकडे सपशेल दुर्लक्ष केले. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना या काळात मोठा फटका बसला. अजूनही दुधाला योग्य भाव मिळत नाहीये. गायीच्या दुधाला 30 रुपये दर मिळाला पाहिजे परंतु सध्या शेतकऱ्यांना लिटरमागे 20 रूपये सुद्धा मिळत नाहीये. सरकारने यासाठी प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यायला हवं. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान दिलं होतं, असं ते म्हणाले. दूध पावडरचा विषय केंद्र सरकारचा असेल तर राज्य सरकारने तसं प्रपोजल बनवून पाठवावे. केंद्र सरकार करेल. परंतु आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी किती वेळा दिल्लीला गेलेत. त्यांना जर शेतीतील काही कळत नसेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, बाळासाहेब थोरात हे शेतीतील जाणकार आहेत. त्यांना केंद्राकडे शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन पाठवा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह कार्यकर्ते ताब्यात
दिंडोरीत खासदार भारती पवार दूध दरवाढीच्या आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खासदार भारती पवार,आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह 15 ते 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर येवल्यातील तळवाडे गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) यांच्या वतीने दूध दरवाढीसाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी दूधाची कोणत्याही प्रकारची नासाडी न करता दुधाचा काढा (हळद,वेलदोडे,दालचिनी टाकून केला काढा) तयार करून हे दूध मोफत वाटप करून आगळेवेगळे आंदोलन आरपीआय चे जिल्हा सरचिटणीस संजय पगारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी गाईच्या दुधाला 10 रुपये प्रति लिटर अनुदान द्या तसेच दुध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे तसेच दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव द्यावा अशी मागणी यावेळी आरपीआय व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
दुध आंदोलनात पुणतांबा गाव सहभागी
राज्यव्यापी दुध आंदोलनात पुणतांबा गाव देखील सहभागी झाले आहे. ऐतिहासिक अशा शेतकरी संपाचं गाव असलेल्या पुणतांबा येथे आज दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं. ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालुन शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी दुधाला 30 रुपये हमीभाव द्यावा आणि 10 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागणी केलीय.
सांगलीत टॅंकर फोडला
महायुतीच्या दूध आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यामध्ये रात्री पडली. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आष्टा आणि तासगाव याठिकाणी दूध वाहतूक रोखत दूध रस्त्यावर ओतले. यावेळी दुधाचा एक टँकर फोडण्यात आला. तर दूध दरावरून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कराड-सोलापूर मार्गावर आंदोलन केले. जर्सी गाय रस्त्यावर उभा करत कराड-सोलापूर मार्गावरील दिघंची गावाजवळ आंदोलन केले. तासगाव-कराड रस्त्यावर रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे कॅन वाहतूक करणारी गाडी रोखून कॅन मधील दूध रस्त्यावर ओतून दिले आहे.यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दूध दरवाढीची मागणी करण्यात आली आहे.
गरिबांना दूध वाटप करून भाजपचं आंदोलन
नागपूर जवळील कामठीयेथील अजनी गावात दूध आंदोलन झाले. इथे मात्र गरिबांना दूध वाटप करून भाजपने आंदोलन केले. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन अजनीच्या दूध संकलन केंद्रावर करण्यात आले. यावेळी गोर गरीब जनता ही केंद्रावर दुधाची भांडी घेऊन येताना दिसली. दूध वाटप करून हे आंदोलन झाले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली.
काय आहेत मागण्या
गायीच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान
दूध भुकटीला प्रति लिटर 50 रुपये निर्यात अनुदान
गायीच्या दुधाला 30 रुपये भाव
औरंगाबाद जिल्ह्यात आंदोलन
दुधाला दरवाढ मिळावी म्हणून औरंगाबादच्या वेगवेगळ्या ठिकाणी भाजपा आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केले. भाजपाच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दूध दरवाढीसाठी आंदोलन केलं. शहरामध्ये आमदार अतुल सावे, गंगापूर मध्ये आमदार प्रशांत बंब औरंगाबादचा केंब्रिज चौकात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं की केंद्रसरकार दरवर्षी डिसेंबरमध्ये दूध भुकटी आयात करण्याची ऑर्डर काढते. यापूर्वी प्रत्येक सरकारने तशी ऑर्डर काढलेली आहे .मात्र अद्याप एक किलो देखील दूध पावडर आयात केलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला दहा रुपये थेट प्रति लिटरमागे त्याच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी हरिभाऊ बागडे यांनी केली. या बरोबरच वैजापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.वैजापूर तालुक्यातील डोनगाव मध्येही दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन केले. सरकारमध्ये असलेल्या तीन पक्षांच्या नावाची फलक लावत ,दगड ठेवून प्रतीकात्मक आंदोलन केलं .हे सरकार दगड आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या भावना कळत नाहीत. त्यांना भावना कळाव्यात म्हणून दगडाला दुग्धाभिषेक केला. त्याबरोबरच गावातील मंदिरातील गणपतीला देखील सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून दुग्धाभिषेक केला. या गावातील लोक आज दुधाचा खवा बनवून सर्वसामान्य व्यक्तीला देणार आहेत.
अहमदनगरमध्ये माजी मंत्री राम शिंदे आंदोलनात
राज्यभरात आज भाजपच्या वतीने दुधाच्या दरवाढीसाठी साठी आंदोलन होत आहे. अहमदनगर येथे माजी मंत्री राम शिंदे यांनी आंदोलन केलं. नगर सोलापूर महामार्ग राज्यमार्गावर माहिजळगाव येथे शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत दूध आंदोलन केले. यावेळी सरकारने दुधाचे दर कमी केले त्यामुळे सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. त्या बरोबरच रस्त्यावर दूध ओतून देखील निषेध करण्यात आला. दुधाला प्रतिलिटर तीस रुपयाचा भाव मिळावा, अशी मागणी यावेळी राम शिंदे यांनी केली आहे.
बीडमध्ये नंदी बैलाला प्रश्न विचारून अन कुत्र्याला दूध पाजून भाजपचं आंदोलन
बीड जिल्हा भाजपच्या वतीने आज दूध दरवाढीच्या समर्थनात जिल्हाधिकारी कचेरीसमोर अनोख आंदोलन केलं गेलं. कार्यकर्त्यांनी चक्क नंदीबैलाला प्रश्न विचारून आंदोलन केलं. त्यानंतर राज्य सरकारचा निषेध म्हणून कुत्र्याला दूध पाजून या आंदोलनाची सांगता करण्यात आली. आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील कड्यामध्ये मोफत दूध वाटप करून आंदोलन केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement