BJP Mahavijay Workshop: भाजपच्या महाविजय कार्यशाळेत "मोठं कुटुंब, सुखी कुटुंब"चा नारा; राष्ट्रवादी-शिवसेनेशी जुळवून घेण्याचे आवाहन
BJP Mahavijay Workshop: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगांने राज्यात भाजपने तयारी सुरू केली आहे. भिवंडीत आज भाजपकडून महाविजय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
BJP Mahavijay Meeting: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे तयारी सुरू केली आहे. आज भिवंडी येथील महाविजय कार्यशाळेत भाजपकडून "मोठं कुटुंब, सुखी कुटुंब"चा नारा देण्यात आला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही घोषणा दिली असून स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत जुळवून घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. आशिष शेलार यांनी भाजपच्या प्रशिक्षण वर्गात मांडणी केली.
आशिष शेलार यांनी यावेळी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीकेचे प्रहार केले. सोनिया गांधी यांना मुलाची, तर शरद पवारांना मुलीची काळजी आहे. आता आपल्या सोबत खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे शेलार यांनी सांगितले. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे आवाहनही शेलार यांनी यावेळी केले.
2024 मध्ये राज्यातून 45 खासदार
मोदी 2024 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा राज्यातले 45 खासदार शपथ घेतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. गेल्या 32 वर्षांत देवेंद्र व माझ्यात एकमत राहिले आहेत. आम्ही तुम्हाला 90 टक्के स्ट्राईक रेट देऊ. पण ज्याप्रकारे तयारी सुरु केली आहे, नेते कुठेही मनाचे खच्चीकरण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहनही बावनकुळे यांनी केले. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनाही ती मदत कामाला येईल, असेही त्यांनी म्हटले.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले की, 1 लाख बूथवर आपण समिती करत आहोत. पेज प्रमुख गठीत करण्यात येणार आहे. एका लोकसभा मतदारसंघासाठी 500 सोशल मीडिया वॉरीयर आपण करत आहोत असेही त्यांनी सांगितले.
16 जुलै रोजी पुन्हा 100 टिफिन बैठका घ्या, 288 टिफिन बैठकांचे रिल्स तयार करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली. त्याशिवाय, भाजपच्या पाठिंब्यासाठी 60 हजार मिस कॉल गेले पाहिजे. यानंतर सर्व कॉलिंग सरळ अँपच्या माध्यमातून होणार आहे असल्याची माहिती त्यांनी दिली.
महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती
महायुतीमधील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तिन्ही पक्षांमधील प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश आहे. एकूण 12 सदस्य समन्वय साधण्याचे काम करणार आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, आशिष शेलार यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आला आहे. शिवसेना- शिंदे गटाकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे समितीत चर्चा करणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून समन्वय समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असणार आहेत.