एक्स्प्लोर
महाराष्ट्र बंद : कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद?
महाराष्ट्र बंद : सोशल मीडियाद्वारे अफवा पसरु नयेत यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र बंद मुंबई : क्रांती दिनाचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरु नयेत यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुठे कुठे इंटरनेट बंद?
पुणे : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट बंद सेवा खंडित करण्यात आली आहे. पुण्यातील शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड, भोर या तालुक्यांमध्ये बंदच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद केलं आहे.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. इतकंच नाही तर दूध संकलन, साखर कराखाने आणि शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
सांगली : मराठा आरक्षणासाठी मराठी क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही बंद आहे.
पंढरपूर : महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने पंढरपुरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. दुपारी चार वाजेपर्यंत इंटरनेट बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, पंढरपूर, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, माळशिरसमध्ये आज बंद पाळण्यात येत आहे. आज व्दादशी असल्याने विठ्ठल मंदिर परिसरातील काही भाग वगळता बंद आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने सोशल मीडियावरुन अफवा किंवा खोट्या बातम्या पसरु नये यासाठी औरंगाबादमधील काही मोबाईल नेटवर्कची इंटरनेट सेवा खंडित करण्यात आहे.
नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही
आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.
अनेक शाळांना सुट्टी
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक शाळांनी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टीचा निर्णय मुख्याध्यापकांकडे सोपवला होता. यानुसार काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतला आहे.
मात्र आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळं दूध आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील.
मराठा आंदोलकांच्या मागण्या
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.
आरक्षणासाठी आत्महत्या
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा 23 जुलैला गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर आज 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिनाचं औचित्य साधत, मराठा मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्राईम
Advertisement