'राजा उदार झाला, हाती भोपळा दिला', शेतकरी मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तोकड्या मदतीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'राजा उदार झाला, हाती भोपळा दिला', अशी परिस्थिती आहे, असा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे.
मुंबई : शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तोकड्या मदतीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुरवणी मागण्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना तीनवेळा पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसात शेत, घरदार वाहून गेलं. असं असताना मुख्यमंत्री दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या हस्ते तीन हजारांचा चेक देण्यात आला. सगळं उद्धस्त झालेल्या शेतकऱ्यांला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन हजारांचा चेक दिला. आपल्या मुख्यमंत्र्यांची आणि शेतकऱ्याची इज्जत राहावी म्हणून तरी केवळ तीन हजारांचा चेक द्यायला नको होता. 'राजा उदार झाला, हाती भोपळा दिला', अशी परिस्थिती आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
कोरोना काळात भ्रष्टाचारावर पुस्तक काढणार कोरोना काळात राजेश टोपे साहेबांनी चांगलं काम केलं पण टोपेंना पुस्तकात स्थान नाही. शेवटच्या काही पानावर टोपेंचा उल्लेख आहे. कोरोना सरासरी मृत्यूमध्ये 14 हजारचे अधिकचे मृत्यू आहेत. जे मृत्यू दाखवले गेले नाहीत. कोरोना काळात आम्हीही सरकारसोबत आहोत. काही गोष्टी सरकारला रोखता येणं शक्य नव्हतं. मात्र काही गोष्टींवर अंकुश मात्र ठेवता आला असता, असं फडणवीस म्हणाले. कोरोना काळात भ्रष्टाचार लपवता आले नाहीत. आम्ही कोरोना काळात भ्रष्टाचारावर पुस्तक काढतोय. कोणी कोणी काय केलंय? कसा भ्रष्टाचार झालाय याचा उलगडा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी यावेळी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील पुस्तकावरुन ठाकरे सरकारला टोला लगावला. “महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही असं पुस्तकाचं नाव आहे. तो थांबूच नये. महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही. थांबवण्याची कोणाची ताकद नाही. पण पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की घोषणा थांबणार नाहीत आणि अमलबजावणी होणार नाही, असं ते म्हणाले.
तर आम्ही रस्त्यावर उतरू देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. आमच्या काळात सर्वोच्च न्यायालयात दोन हिअरिंग झाल्या. मात्र स्टे आला नाही. मात्र आता स्टे आला आहे. आमच्या काळात अनेक आंदोलन झाली मात्र कोणाला अटक नाही झाली. आता तर अनेक मराठा तरुणांना घरीच थांबवलं जात आहे. त्यांना मुंबईत येऊ दिलं जात नाही. त्यांच्याशी चर्चा करायला काय हरकत आहे, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, सरकार मधील मंत्री सरकार विरोधात मोर्चा कसे काढू शकतात. त्यांनी शपथ घेतली आहे. त्या शपथेचा भंग होत आहे. ओबीसींच्या आरक्षणात कोणाला वाटेकरी होता येणार नाही असा ठराव मंत्रीमंडळ बैठकीत घ्या. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सत्तारूढ पक्ष करत असेल तर ते योग्य नाही, असंही ते म्हणाले. ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू ही आमची भूमिकाच आहे, असंही ते म्हणाले.
कृषी बिलावर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात खाजगी एपीएमसी कायदा आहे. अनेकांना लायसन्स दिले आहेत. मग केंद्रातील कायद्याला विरोध करायला दिल्लीत कशाला आंदोलन करता. महाराष्ट्रात हे आंदोलन केले पाहिजे. कायद्यासंदर्भात पहिली तक्रार महाराष्ट्रात झाली. शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे ते खरं आहे आणि तसाच कायदा झाला आहे, असं ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात आमच्यात विसंवाद नाही. पण ऊर्जा विभागाची आठ वेळा फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे गेली. पण ती पाहिलीही नाही. नगरविकास आणि msrdc संदर्भात अनेक सवांद झाले. किती खरं आणि किती खोटं हे आम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळालं. ऊर्जा मंत्री म्हणतात वापरलेल्या विजेचं बिल भरावं लागेल मात्र जे वीज वापरली नाही ते बिल का भरायचं. कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली मध्ये एक घर वाहून गेलं आहे आणि त्यांना ही मोठं बिल आलं आहे, असं ते म्हणाले.