(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार; आता 4 विषय एका पुस्तकात!
पुणे : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एकाच पुस्तकात 4 विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022-2023 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयाचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे पहिल्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे. सुरुवातीला ही पद्धत इयत्ता पहिलीसाठी असेल, त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाईल. यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय - इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिक; प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले गेले आहेत. प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक वेगळे घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4 असे, फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणे आवश्यक आहे.
बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले की, "सध्या इयत्ता पहिलीचा विद्यार्थी, जो सुमारे 6 वर्षांचा आहे, त्याच्या बॅगेत किमान 830 ग्रॅम इतके पाठ्यपुस्तकांचे वजन असते. यामध्ये पाण्याची बाटली, डब्बा आणि पुस्तकांचे वजन जोडल्यास बॅगेचे वजन 1 किलोग्रॅमच्या पुढे जाते. परंतु नव्या पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकांचे वजन 210 ग्रॅमपर्यंत कमी होते. प्रायोगिक तत्त्वावर, 488 मॉडेल स्कूलमध्ये पुस्तके सादर करण्यात आली आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
गोसावी यांनी सांगितले की, ''2022-23 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक आणले जाईल. त्यानंतर इयत्ता दुसरी आणि अशाच प्रकारे केले जाईल. नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर त्यात आवश्यक बदल देखील करण्यात येतील. आम्हांला हे पाठ्यपुस्तक वापरणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मिळाली आहे."
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका रेखा वरपल्लीवार म्हणतात, ''हा एक चांगला उपक्रम आहे, विशेषत: दुर्गम भागातील मुलांसाठी, जिथे शाळा खूप दूर आहेत आणि विद्यार्थ्यांना जड पिशव्या घेऊन लांब अंतर चालावे लागते. पिशवीचे वजन कमी झाले आहे. पुस्तकात नमूद केलेले उपक्रमही खूप उपयुक्त आहेत."
रायगडमधील आणखी एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मंजिरी खांबे यांनी सांगितले की, ''पुस्तकाच्या प्रत्येक भागाची थीम आहे. पहिला भाग म्हणजे 'मी आणि माझे कुटुंब', त्यानंतर 'पाणी', 'प्राणी' आणि शेवटी, चौथा भाग म्हणजे 'वाहतूक आणि आम्हाला मदत करणारे लोक'. सध्या आम्ही दुसरा भाग शिकवत आहोत. उपक्रम खूप सोपे आहेत. विद्यार्थी सर्वकाही स्वतः करु शकतील अशा पद्धतीने हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्यामध्ये कुतूहल वाढवण्यावर भर दिला आहे. जेणेकरून ते विद्यार्थ्यांना आयुष्यभरासाठी मदत होईल."
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- SSC HSC Board exam 2022 : दहावी बारावीचं वेळापत्रक तयार, मात्र परीक्षा कशी घ्यायची? काय आहे बोर्डाचा विचार
- Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांना दिलासा, न्यायालयाने रद्द केली तक्रार
- Omicron Variant : दिलासादायक बातमी! राजस्थानमधील सर्व 9 ओमायक्रॉन बाधित निगेटिव्ह
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha