Lok Sabha Election Phase 1: पाच मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 44.12 टक्के मतदान; गडचिरोलीत सर्वाधिक तर उपराजधानीची पिछाडी
पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. तर या पाच मतदारसंघात सर्वात कमी नागपुरात 38.43 टक्के तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोली-चिमुर मतदारसंघात झाले आहे.
Nagpur Lok Sabha Election 2024: अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. नागपूरसह (Nagpur) पूर्व विदर्भातील एकूण पाच मतदारसंघात आज निवडणुकांची रणधुमाळी रंगणार असून अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच प्रशासनाने मतदानप्रक्रियेची पूर्ण तयारी केली असून, उपराजधानीत 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. असे असतांना पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. तर या पाच मतदारसंघात सर्वात कमी नागपुरात 38.43 टक्के तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 55.79 इतके मतदान झाले आहे.
आज सकाळी 7 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झाली असून विदर्भातील (Vidarbha) उष्णतेचा पारा लक्षात घेता सकाळच्या टप्प्यातच मतदानाचा हक्क बजावण्यास मतदारांचा कल दिसला. मात्र, प्रखर उष्णतेचा वाढता पारा लक्षात घेता, दुपारच्या सत्रात लोकांनी मतदान करणे टाळले आहे. आता उर्वरित वेळेत मतदार मतदानकेंद्रांवर जाऊन मतदान करतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाच मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान
नागपुरात मतदान सुरू होताच पहिल्या दोन तासात 13 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने डोळ्यापुढे ठेवलेले उपराजधानीत मतदानाचे उद्दिष्ट गाठले जाणार, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र गेल्या काही दिवसापासून विदर्भात उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे त्याचा फटका हा मतदानालाही बसला आहे. परिणामी दुपारी वाढते उन लक्षात घेता मतादारांनी दुपारच्या सत्रात घरातून बाहेर पडण्यास फारशी पसंती न दिल्याचे दिसले. मात्र आता संध्याकाळी उन उतरताना मतदाते बाहेर पडतील, अशीही अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. यात रामटेक येथे 40.10 टक्के, नागपूर येथे 38.43 टक्के, भंडारा- गोंदिया 45.88 टक्के, गडचिरोली- चिमूर येथे 55. 79 टक्के आणि चंद्रपूर येथे 43. 48 टक्के मतदान झाले आहे.
75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट
भारतीय लोकशाहीच्या भवितव्यासाठी संविधानाने दिलेला सर्वात महत्त्वांचा हक्क बजावण्याची संधी पुन्हा एकदा मतदारांकडे आहे. त्यामुळे कुठलीही टाळाटाळ न करता मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी शासकीय स्तरावर किंवा इतर विविध संस्थांतर्फे जनजागृती करण्यात आली आहे. मतदानाचा टप्पा वाढवा यासाठी प्रशासनाने मतदानप्रक्रियेची पूर्ण तयारी केली असून, सुरक्षेच्या अनुशनगाने कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सोबतच नागपुरात 8 विशेष मतदान केंद्रही उभारण्यात आले आहे. एकुणात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्व स्तरावरच्या यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात मतदान होऊन जिल्हा प्रशासनाचे 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठले जाणार, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या