Lockdown 4.0 | बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी
राज्य सरकारने लॉकडाऊन 4.0 ची नवी नियमावली जाहीर केली. यामध्ये बिगर रेड झोनमध्ये सलून सुरु करण्यास अटी आणि शर्थींसह परवानगी दिली आहे.
मुंबई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0 नव्या नियामावलीत बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दाढी-केस कापण्यासाठी वाट पाहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र सलून सुरु केल्यानंतर मास्क, हँड सॅनिटायझरबाबतचे नियम आणि कोरोना संदर्भातील अटी-शर्थींचे पालन करणे सलून चालकांना बंधनकारक असणार आहे.
बिगर रेड झोनमधील सलून सुरु झाल्याने तेथील नागरिकांना वाढलेल्या दाढी-केस यांच्यापासून सुटका मिळणार आहे. सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे कठीण आहे. त्यामुळे सलून जरी सुरु झाले तरी कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक दाढी-केस कापण्यासाठी सलूनमध्ये जाणार का? हा मोठा प्रश्न आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातही ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र स्थानिक प्रशासनाने तेथील कोरोनाच्या संसर्ग परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याने अनेक ठिकाणी सलून बंदच होते. मात्र लॉकडाऊन 4 मध्ये आता कोणताही निर्णय घेताना स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार राज्य शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
सलून बंद असल्याने सर्वसामन्यांपासून नेते मंडळी, सेलिब्रिटी सर्वांच्याच दाढी, केस वाढल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियावर अनेकांनी घरीच दाढी, केस कापल्याचे व्हिडीओ देखील शेअर केले होते, तर काहींना दाढी केस वाढलेला नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता, यामध्ये सेलब्रिटी, नेते मंडळी यांचाही समावेश होता.
गेल्या दोन महिन्यापासून सलून बंद असल्याने सलून व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काही संघटनानी अटी-शर्थींसह सलून उघडण्याची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती देखील केली होती.
- अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने
- इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार
- स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकाने सुरू करता येणार, दारूच्या होम डिलिव्हरी करता येणार
- टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार
- चार चाकीमध्ये 1+ 2 आणि दुचाकीवर एकालाच परवानगी
- मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात सुरू ठेवू शकतात
- दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी
- विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी
- स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी
- आंतरजिल्हा बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी
- सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते
- आज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार
- स्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते. हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे.
- बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी
- ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार
- आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार
- शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, बंदच राहणार.