एक्स्प्लोर
मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा
पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. त्याचसोबत किनारपट्टी भागात हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : शुक्रवारपासून अपवाद वगळता राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुढच्या 2 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. त्याचसोबत किनारपट्टी भागात हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून अंधेरी, दहिसर, ठाणे, नवी मुंबई, कांदिवली, सांताक्रुझ, गोरेगावसह पूर्व पश्चिम उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान तिन्ही मार्गावरील लोकलसेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे.
ठाण्यात शाळांना सुट्टी, आयुक्तांची घोषणा
मुसळधार पावसाने ठाण्यामधील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. ठाण्यात अवघ्या 2 तासात 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे रेल्वे स्ठानकात ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा देखील प्रभावित झाली आहे. पावसामुळे ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला.
वसई-विरारमध्ये सध्या पावसाचा जोर
वसई-विरारमध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. नालासोपारा पूर्व इथे स्टेशन परिसरात पुलाखाली आणि सेंट्रल पार्क इथे पाणी साचलं आहे. रात्री एक वाजता नालासोपारा पूर्वचा स्टेशन परिसर, सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. आज सकाळीही या रस्त्यावर फूट ते दीड फुट पाणी साचलेलं दिसून आलं. त्याचप्रमाणे नालासोपाराचा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या खाली पूर्णपणे पाणी साचलं आहे. आचोले रोड, सेंट्रल पार्क, तुलिंज, नगिनदास पाडा, गालानगरमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. पाऊस दुपारपर्यंत असाच सुरू राहिला तर निश्चितच शहरातील पूर्णपणे जनजीवन विस्कळीत होणार आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात अतिवृष्टिचा इशारा दिला आहे.
पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला
पुणे शहरात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण दुपारनंतर पावसाचा पुन्हा जोर वाढला. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समुहातील खडकवासला आणि पानशेत ही दोन धरणं आधीच पूर्णपणे भरली असून वरसगाव आणि टेमघर ही इतर दोन धरणही भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील इतर धरणही ओसंडून वाहू लागली आहेत. त्यामुळे मुळा, मुठा , पवना, इंद्रायणी , भीमा या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्यात.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून उत्तर रत्नागिरीत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. खेड, दापोलीमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडीचा पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर पुलावरती पोलीस तसेच मदत गृपचे रक्षक तैनात करण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
भिवंडीत रात्रीपासून पावसाची संततधार
भिवंडीत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातील विविध सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे काही भागांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
शहरातील नदीनाका, बाजारपेठ, तीनबत्ती, भाजी मार्केट, शेलार, कल्याण नाका, पद्मानगर, समृबाग,आमपाडा, इदगाह,बंदर मोहल्ला,खाडीपार इत्यादी परिसरात पाणी साचले आहे.
कामवारी नदीत अडकलेल्या तरुणाची सुटका
कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत अशून पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना लाऊड स्पीकरच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहर आणि धरण क्षेत्रात रात्रभर पाऊस
पुणे शहर आणि धरण क्षेत्रात रात्रभर पाऊस होता. पण हा पाऊस सकाळी थांबला. पानशेत धरण क्षेत्रात रात्रभरात 122 मिमी, वरसगाव 116 मिमी , टेमघर 178 मिमी तर खडकवासला धरण क्षेत्रात 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पानशेत आणि खडकवासला ही धरणं आधीच पूर्णपणे भरली असून वरसगाव 90 टक्के तर टेमघर 80 टक्के भरलं आहे.
पवना धरणाचे सहा दरवाजे उघडले
पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाचे सर्व सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. अर्ध्या फुटाणे दरवाजे उघडत त्याद्वारे 2200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. आज पहाटे सहा वाजता जलविद्युतद्वारे 1400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. गेल्या शुक्रवारी धरणात केवळ 50 टक्के साठा होता. मात्र या आठवड्यात पावसाने कृपा दृष्टी दाखवल्याने धरण तुडुंब भरलं आहे. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पवना नदी लगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने मोसम नदीला पूर
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने मोसम खोऱ्यातील हरबारी धरण आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरुन धरणाच्या सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. मोसम नदीला पूर आल्यामुळे मोसम नदी किनाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मोसम नदीला आलेल्या पुरामुळे मोसम नदीवरील पाणी योजना पुन्हा एकदा कार्यान्वीत होऊन त्याचा फायदा या परिसरातील नागरिकांना होणार आहे. मोसम नदीचे हेच पाणी मालेगावात येऊन पुढे ते गिरणाधरणात पोहोचत असल्याने गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
पालघरमध्ये रात्रीपासून पाऊस, सूर्या आणि वैतरणा नद्यांची पातळी वाढली
पालघर रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील सूर्या आणि वैतरणा या प्रमुख नद्यांची पातळी वाढली आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे 70 सेमीने उघडण्यात आले असून धामनी आणि कवडास मिळून 21600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीद्वारे सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय पालघर, बोईसर, साफळे , डहाणू, बोर्डी या भागातही जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा उशिराने सुरू असली तरी उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. रात्रभर वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी घराचा काही भाग कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पावसामुळे पालघर मधील काही खाजगी शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. तर आज दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने सातपाटी, डहाणू खाडी या भागात पाणी शिरण्याची भीती आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी आहे. समुद्र किनारी वारा असल्याने मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 72 तास जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच वेगाने वारे वाहणार असल्यामुळे समुद्र खवळलेला राहील.
आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
राज्यात पाऊस वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पडत असल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच शाळेला सुट्टी देता यावी म्हणून सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री अशिष शेलार यांनी घेतला आहे. त्याचा शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली असल्यास शाळाअंतर्गत फेरपरीक्षा घेण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना व बोर्डाच्या परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना राहतील असा निर्णयही घेण्यात आला आहे.
इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले
चंद्रपूर : चंद्रपूर वीज केंद्र आणि चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणारे इरई धरण 100 टक्के भरले आहे. मात्र पावसाची शक्यता पाहता प्रशासनाने घेतला सर्व दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. धरणाची सातही दारे 2.5 मीटरने उघडली आहेत. धरणातून 1112 क्युबिक मीटर प्रति सेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे.
भिवंडी शहरात मुसळधार पाऊस होत असल्याने कामवारी नदीची पातळी वाढली असून नदी दुथडी वाहत आहे. अशा परिस्थितीत युनुश ताहीर शेख नावाच्या तरुणाने नदीमध्ये पोहण्याकरता उडी मारली मात्र नदीची पातळी व प्रवाह अचानक वाढल्याने हा तरुण मध्यभागी अडकून बसला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने या तरुणाला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. सध्या युवकाला उपचाराकरिता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी
सळधार पावसामुळे कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचलंय. यामुळं व्यापारी वर्गात नाराजीचं वातावरण आहे. कल्याणच्या शिवाजी चौकाजवळ कल्याण शहरातली मुख्य बाजारपेठ आहे. या भागात रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं असून हे पाणी अनेक दुकानातही शिरलंय. तर लक्ष्मी मार्केटमध्ये तब्बल गुडघाभर पाणी साचलंय. या पाण्यातून व्यापारी आणि नागरिक वाट काढतायत. या भागात गेल्या तीन वर्षात एकदाही नालेसफाई झालेलीच नसल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे. शिवाय अनेकदा केडीएमसीकडे तक्रारी करूनही कुणीही लक्ष देत नसल्यानं व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
कल्याणचा शिवाजी चौक तुंबला
तासाभराच्या पावसातही पाणी साचणारा कल्याणचा शिवाजी चौक आजही नेहमीप्रमाणे तुंबला. शिवाजी चौकातून जुन्या कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. शिवाजी चौक हा कल्याणचा सखल परिसर समजला जातो. या चौकात नेहमी पाणी साचतं असा इतिहास आहे. आजही सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी चौकात पाणी साचलं असून यामुळे शिळफाटा-भिवंडी मुख्य रस्त्यावर पाणी साचलंय. शिवाय बाबासाहेब आंबेडकर रोडवरुन जुन्या कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.
भातसा धरणाचे दरवाजे 2मीटरने उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या दोन दिवसापासून पावसाने मोठ्या प्रमाणात कहर केला आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळच्या सुमारास भातसा धरण ओसंडून वाहू लागले. त्यामुळे भातसा धरणाचे पाचही दरवाजे दोन फुटापर्यंत उघडण्यात आले आहे. भातसा धरण वाहू लागल्याने, भातसा नदीच्या पात्रातही पाण्याची पातळी वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन धरणाखालील शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. साजिवली, सावरशेत, खुटाडी, अर्जुनली, सापगाव, सरलांबे आवरे, हिव, अंदाड, कांबारे, खुटघर, भातसई, वासिंद, शहापूर आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement