(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : नागपुरात हायवेवर धावतोय बिबट्या!, थरारक व्हिडीओ व्हायरल
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एक बिबट्या धावत असल्याचं थरारक व्हिडीओ व्हायरल झालाय.रस्त्यावरून वाहतूक सुरु असताना तो चक्क एक ते दीड किलोमीटर महामार्गावरच धावत सुटला.
नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एक बिबट्या धावत असल्याचं थरारक व्हिडीओ व्हायरल झालाय. महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या खवासापासून सुमारे एक-दोन किलोमीटरपुढे मध्यप्रदेशच्या सिवनीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा बिबट्या सुमारे एक ते दोन किलोमीटर महामार्गावर धावत होता. खवासा-सिवनी दरम्यान हा बिबट्या हायवेवर चढला. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच कठडे असल्यानं त्याला महामार्गावरून बाहेर पडता आले नाही. त्यामुळं रस्त्यावरून वाहतूक सुरु असताना तो चक्क एक ते दीड किलोमीटर महामार्गावरच धावत सुटला.
यावेळी महामार्गावरून बाईक, सायकलवरून देखील काही जण प्रवास करताना व्हिडीओत दिसत आहे. बिबट्या रस्त्यावरून धावत असल्याचं पाहून अनेकांची भंबेरी उडाली. तर काही कारचालकांनी त्याचा पाठलाग करत बिबट्याचा व्हिडीओ बनवला आणि वनविभागाला कळवलं. महामार्गावरून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसल्यामुळं धावत धावत दमलेला बिबट्या रस्त्याच्या कडेला थोडाकाळ थांबलाही.
VIDEO | नागपूरजवळ खवासा-सिवनी दरम्यान एक बिबट्या हायवेवर आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच कठडे असल्यानं त्याला महामार्गावरून बाहेर पडता आले नाही. त्यामुळं तो एक ते दीड किलोमीटरपर्यंत महामार्गावरच धावत सुटला. #Nagpur pic.twitter.com/YbAZUlPkIa
— ABP माझा (@abpmajhatv) October 23, 2020
दरम्यान बाहेर पडण्याचं मार्ग न मिळाल्यामुळं तो बिबट्या ज्या दिशेनं महामार्गावर आता आला होता. तिकडेच माघारी जात जंगलात परतला. महत्वाचं म्हणजे नागपूर सिवनी मार्गावर जंगालातून हा हायवे जात असताना वन्यजीवांना त्रास होवू नये, यासाठी अंडरपासही बनवले आहेत. मात्र हायवेवर वन्यप्राणी चढल्यावर रस्त्यात त्याला बाहेर पडण्यासाठी मध्ये योग्य ठिकाणी जागा सोडल्या नसल्याचं या घटनेमुळं एकदा पुन्हा समोर आलंय. यापूर्वीही याच राष्ट्रीय महामार्गावरून मध्यप्रदेश पेंच परिसरात एलिव्हेटेड भागात एक वाघ रस्ता ओलांडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यावेळीही काही काळानंतर वाघ सुरक्षित या परिसरातून निघून गेला होता.