लक्ष्मण हाके पोलिसांसोबत अज्ञातस्थळी रवाना, ताब्यात की अटक? पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. ते बीड पोलिसांसोबत अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
Laxman Hake : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. ते बीड पोलिसांसोबत अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. लक्ष्मण हाके हे पोलिसांच्या नजरकैदेत? असल्याचं बोललं जात आहे. जालन्यातील वडिगोद्री येथून पोलिसांसोबत हाके रवाना झाले आहेत.
गेवराईचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची टीम देखील रवाना झाल्याची माहित मिळत आहे. लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय की अटक केली याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. मात्र, हाके शिर्डीच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती मिळत आहे.
गेवराईत लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांत राडा
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनापूर्वीच काल (25 ऑगस्ट) बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांत राडा झाला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पुढील पंधरा दिवस कुठलेही आंदोलन निदर्शने होणार नाहीत. एवढेच नाही तर पाच पेक्षा अधिक जमाव एकत्रित येण्यास देखील मज्जाव घालण्यात आला आहे. या दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई झुगारण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाने दिला आहे.
लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बीडमधील गेवराई शहरात दोन गटांमध्ये झालेल्या राडा प्रकरणाने खळबळ उडाली आहे . या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील समर्थकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून गेवराई पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई शहरात काल (25 ऑगस्ट) दोन गट आमने-सामने आले होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी पूर्वीच लक्ष्मण हाके यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही हाके गेवराईत उपस्थित राहिल्याने दोन्ही गटातील वाद वाढला आणि वातावरण तणावपूर्ण बनले आहे. पोलिसांनी दोन्ही गटांवरही कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गेवराईतील या राडा प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने शिस्त राखण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
कुठेही जायचं आणि माकड चाळे कराचये, लक्ष्मण हाके ओबीसींचा नेता नाही, विजयसिंह पंडितांचा हल्लाबोल
























