आधी अतिवृष्टी, आता वीज तोडणी; लातूर वीज परिमंडळातील शेतकरी दुहेरी संकटात
Latur News Update : लातूरमधील शेतकऱ्यांपुढे वीज बिलाचे संकट उभे राहिले आहे. थकित वीजबिल तत्काळ भरा अन्यथा वीज पुरवठा तोडण्यात येणार अशी भूमिका महावितरण कंपनीने घेतली आहे.
लातूर : अतिवृष्टीचा फटका आणि त्यानंतर शेतमालाचे पडलेले भाव. यामुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता वीज बिलाचे संकट उभे राहिले आहे. थकित वीजबिल तत्काळ भरा अन्यथा वीज पुरवठा तोडण्यात येणार अशी भूमिका महावितरण कंपनीने घेतली आहे. याचा फटका लातूर परिमंडळातील 18 हजार 667 शेतकऱ्यांना बसला आहे. थकित वीज बिलासाठी कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडे 73 कोटींची थकबाकी आहे.
कृषिपंपांच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने लातूर परिमंडळात आठ दिवसांपासून धडक मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील उदगीर विभागातील पाच हजार पेक्षा अधिक कृषिपंपांचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांपुढे नवीन समस्या निर्माण झाली आहे. लातूर परिमंडळात लातूर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश होतो.
आठ दिवसांत 18 हजार 667 पेक्षा जास्त शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यानंतर परतीच्या पावसामुळे खरिपाचे नुकसान झाले. त्याच्या भरपाईपोटी अद्याप विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यातच आता महावितरणने ही मोहीम सुरू केल्याने शेतकऱ्या समोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
मागील चार ते पाच वर्षापासूनची थकबाकी असणारे अनेक शेतकरी आहेत. त्यामुळे लातूर परिमंडळातील 18 हजार 667 शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडे 73 कोटीची थकबाकी आहे. एकूण थकबाकी खूप आहे. यामुळे ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती लातूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन दिवटे यांनी दिली आहे.
थकबाकी कोट्यवधीची, वसुली मात्र लाखात
महावितरणची या तीन जिल्ह्यातील थकबाकी 5 हजार आठशे कोटींची आहे. वसुली मात्र दोन टक्के ही होत नसल्यामुळे महावितरण कंपनीने वसुलीसाठी सक्ती सुरू केली आहे. महारष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरणच्या लातूर परिमंडळात एकूण कृषी पंप धारक शेतकऱ्याची संख्या चार लाख 63 हजार 391 आहे. लातूर परिमंडळात लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. या तिन्ही जिल्ह्यात मिळून कृषी पंप धारक शेतकऱ्यांकडे 5 हजार आठशे कोटीची थकबाकी आहे. ही आकडेवारी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटची आहे.
लातूरमध्ये कृषी पंप धारक 1 लाख 31 हजार 400 शेतकरी
थकबाकी 1717 कोटी
वीज पुरवठा खंडित 6625
बीडमध्ये कृषी पंप धारक 1लाख 78 हजार 550 शेतकरी
थकबाकी 2185 कोटी
वीज पुरवठा खंडित 10832
उस्मानाबादमध्ये कृषी पंप धारक 1 लाख 53 हजार 440 शेतकरी
थकबाकी 1800 कोटी
वीज पुरवठा खंडित 1210
एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे महावितरण कंपनीने वसुलीसाठी सक्ती सुरू केली आहे. विविध प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या असल्या तरी शेतकरी वर्गातून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. किमान चालू महिन्याचे बिल तरी भरण्यात यावे अशी सक्ती केली जात आहे. याचा परिणाम आता दिसून येत आहे. उदगीर येथे एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी वीज बिल भरले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सायस दराडे यांनी दिली.
मागील काही महिन्यात शेतकरी नैसर्गिक संकट त्यानंतर पडलेले शेतमाल भावामुळे त्रस्त आहे. रब्बीची परेनी सुरू आहे, पाण्याची आवश्यकता आहे, अशा काळात शेतकऱ्यांना या संकतला सामोरे जावे लागत आहे. सरकारने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.