ऊस एकाचा अन बिल उचलले दुसऱ्यानेच, लातूरच्या मांजरा साखर कारखान्यात चक्क उस बिलाची चोरी
Latur : शेतकऱ्याच्या 49 टन ऊसाचे बिल हे एका ट्रॅक्टर ड्रायव्हरला देण्यात आल्याची घटना लातूरमधील मांजरा कारखान्यात घडली आहे.
लातूर: एकीकडं साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेत नसल्यानं ऊसाचा प्रश्न गंभीर बनलाय, तर दुसरीकडं चक्क शेतकऱ्याच्या उसाचीच चोरी झाल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातल्या रामेश्वर इथं घडलाय. शेतकऱ्याचा तब्बल 49 टन ऊस ट्रॅक्टर ड्राइव्हरने स्वतःच्या नावावर दाखवून त्याचं बिल उचललं असल्याचं समोर आलं आहे.
रामेश्वर येथील हनुमंत कराड यांचा ऊस मांजरा कारखान्याला गेला होता. मात्र नेमका किती टन ऊस कारखान्याला पोहचला आणि त्याचं किती बिल निघालं याची माहिती कारखाना प्रशासनानं त्यांना दिली नाही. यावरून हनुमंत कराड यांनी कारखान्याच्या बँकेचे स्टेटमेंट काढल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
यामध्ये कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत असल्याचा आरोपल या शेतकऱ्याने केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उस बिल चोरी करणारा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आणि कारखाना प्रशासनातील कर्मचाऱ्याला शेतकऱ्यानं गावातच अडवून ठेवले. तीन ते चार तास त्यांना गावातच बसवून ठेवण्यात आलं. ट्रॅक्टर ड्राइव्हरने झालेला प्रकार सांगितला. तर कारखाना प्रशासनातील कर्मचाऱ्याने हा प्रकार केवळ नजरचुकीने घडला असल्याचं सांगत प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये उस गाळपाचा प्रश्न गंभीर बनला असताना, अजूनही कित्येक एकर उस गाळपाला गेला नसताना दुसरीकडे हा कारखाना प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. त्यामुळे दोन्हीकडूनही शेतकऱ्यांना मन:स्ताप सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, राज्यभरातील विशेषतः मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस प्रश्नी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी शिष्टमंडळ आणि साखर आयुक्ताची गुरुवारी एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे साखर आयुक्तांनी मान्य केले आहे. बीड, परभणी, जालना येथील अतिरिक्त ऊसाचे तात्काळ गाळप करण्याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन साखर आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha