पतीची शेवटची इच्छा म्हणून पत्नीचं पंढरपूर येथील विठ्ठल चरणी 1 कोटी रुपयांचं दान
पतीची शेवटची इच्छा म्हणून पत्नीने पंढपूर येथील विठ्ठल चरणी 1 कोटी रुपयांचं दान दिलं आहे. या महिलेच्या पतीचं कोरोनाने निधन झालं आहे.
पंढरपूर : मुंबई येथील एका भाविकाने विठ्ठल मंदिराला तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या भाविकांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स कंपनीकडून आलेली रक्कम कुटुंबाने विठुरायाला अर्पण केली. विशेष म्हणजे या भाविकांच्या कुटुंबाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती समितीला केल्याने या दानशुराचे नावं समजू शकले नाही. अलीकडच्या काळात विठुरायाला मिळालेली ही सर्वात मोठी देणगी आहे.
गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या विठुरायाला एका महिला भाविकाने पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी एक कोटी रुपयाचे गुप्तदान दिले आहे. मंदिराच्या इतिहासात ही मंदिराला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मुंबई येथील एक तरुण विठ्ठलभक्त कोरोनाच्या संकटात दोन महिन्यापूर्वी जग सोडून गेला. विठ्ठलावर असलेली टोकाची श्रद्धेमुळेच त्याने मृत्यूसमयी आपल्या पत्नी आणि आईला बोलावून निधनानंतर विमा कंपनीकडून येणारी सर्व रक्कम विठुरायाला अर्पण करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली. दुर्दैवाने यानंतर काही दिवसात या विठ्ठल भक्ताचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर खरे तर विम्याची येणारी रक्कम विधवा पत्नी आणि लहान मुलींसाठी उपयोगी ठरली असती. मात्र, पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी या विधवा पत्नीने विमा कंपनीकडून आलेले 1 कोटीची रक्कम मंदिराला देण्याचा निर्णय घेतला.
Ashadhi Ekadashi 2021 : सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी... माऊलींच्या गाभाऱ्यात फळाफुलांचा बहर
आषाढी यात्रेची संचारबंदी संपल्यावर आठ दिवसापूर्वी ही महिला आपली मुलगी आणि सासूला घेऊन विठ्ठल मंदिरात पोहचली. आपल्या पतीच्या इच्छेप्रमाणे आपल्याला विठुरायाच्या चरणी गुप्तदान देण्याचे तिने मंदिर प्रशासनाला सांगितले. आपल्या पतीचे निधन झाले असून पतीच्या इचछेनुसार आपण एक कोटी रुपयाची देणगी दिल्याचे बाहेर आल्यास आपल्या कुटुंबाला त्रास होऊ शकेल. त्यामुळे आपले अथवा आपल्या दिवंगत पतीचे नाव आणि देणगी रक्कम गुप्त ठेवण्याची विनंती या विधवा पत्नीने केली होती. त्यानुसार मंदिराकडून गेल्या आठ दिवसात याबाबत कोणतीच माहिती मिळू शकलेली नव्हती. दरम्यान आज एका कर्मचाऱ्याकडून ही गुप्त माहिती लीक झाली आणि प्रसार माध्यमांना ही माहिती समजली.
यानंतर मंदिर प्रशासनाने या 1 कोटीच्या देणगीबाबत दुजोरा दिला असून या महिलेने 10 लाखाचे 10 चेक मंदिर प्रशासनाच्या ताब्यात दिले आहेत. विशेष म्हणजे या अनोख्या विठ्ठल भक्ताला मृत्यूच्या वेळीही आपली पत्नी आणि लहान मुलीच्या भवितव्यापेक्षा देवावरची श्रद्धा मोठी वाटली. असेच त्याच्या विधवा पत्नीलाही आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपले आणि आपल्या लहानग्या मुलीच्या भविष्यापेक्षा त्याचा अखेरचा शब्द पाळणे महत्वाचे वाटले. आजच्या युगातही अशी माणसे दिसतात तेही या विठ्ठला मुळेच.