Nanded Land scam : नांदेड जिल्ह्यात भूखंड घोटाळा, जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीच्या अहवालात उघड
नांदेड शहरालगत असणाऱ्या जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने अहवालात ही बाब समोर आली आहे.
Nanded Land scam : नांदेड जिल्ह्यात भूखंड घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. बोगस एन ए, गुंठेवारी दाखवत, भूखंड लाटल्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने अहवाल दिला आहे. नांदेड शहरालगत असणाऱ्या जमिनींच्या ले आउटच्या चक्क बनावट कॉपी दाखल करुन 186 रजिस्ट्री करण्यात आल्याचे यामध्ये निष्पन्न झालं आहे. केवळ 2 महिन्यांच्या चौकशीत हा मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झालं आहे.
नांदेड जिल्ह्यात भूखंड माफीयांनी बनावट एन ए, ले आऊट, बोगस स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करुन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन हे व्यवहार केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने निष्पन्न केलं आहे. तुकडे बंदीचे आदेश आल्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोनच महिन्यात दस्तनोंदणी कार्यालयात हा महाघोटाळा झाला असून, कोट्यवधी रुपयांच्या जमीन खरेदी-विक्रीची तब्बल 186 प्रकरणे बोगस असल्याचे समितीने केलेल्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 या दोनच महिन्यात दुय्यम निबंधक 1, 2, 3 या ठिकाणावरील संशयास्पद असलेल्या 659 दस्त नोंदणीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी नांदेड तहसीलदार, नायब तहसीलदार, साहाय्यक संचालक नगररचना, सहाय्यक संचालक नगररचना मनपा, उपविभागीय अधिकारी आणि सहजिल्हा निबंधक वर्ग 1 यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नांदेड जिल्हा दस्त नोंदणी कार्यालयात अकृषीक 52 , गुंठेवारी 4, बोगस अभिण्यासाची 90 अशी 186 दस्तांची बोगस नोंदणी झाल्याचे उघड झालं आहे. विशेषतः यात अर्थपूर्ण व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाल्यानं कुणीही अवाक्षरही काढले नाही. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांना तक्रारी केल्यानंतर त्यांनी चौकशी समिती स्थापन करुन या प्रकरणाचे बींग फोडले आहे.
अनेक खरेदी-विक्री प्रकरणात तर अफलातून प्रकार उघडकीस आले आहेत. ज्यामध्ये नांदेड महापालिका क्षेत्राला लागून असणाऱ्या वाडी ग्रामपंचायतचा आधार घेत, अभिन्यास वाडी ग्रामपंचायतीचा आणि नकाशा मंजुरी मनपाची असल्याचे आश्चर्यकारक प्रकार या प्ररकरणात घडलेत. त्यामुळं शहरातील अनेक भूखंड माफियांनी कोट्यावधी रुपयांच्या जमिनी बोगस कागदपत्रांच्या आधारे लाटल्या असून, यातील किती जणांवर कारवाई होते हे लवकरच स्पष्ट होईल.