Raj Thackeray: दोन महिन्यात लाडकी बहीण योजना बंद होईल, पगार द्यायला सुद्धा पैसे नसतील; राज ठाकरेंकडून महायुतीचे वाभाडे
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढच्या दोन महिन्यात बंद होतील, असं म्हणत महायुती सरकारचे वाभाडे काढले आहेत.
Raj Thackeray: राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची सर्वदुर चर्चा आहे, या योजनेवरून अनेकदा विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे, अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढच्या दोन महिन्यात बंद होतील, असं म्हणत महायुती सरकारचे वाभाडे काढले आहेत. मेळाव्यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज ते लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहेत, कोणी मागितले होते ते, मला आपल्या इतकच्या राजकारण्यांचा उद्देशच कळत नाही. हेतूच कळत नाही, तुमच्याकडे कोणी मागितले होते पैसे असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणालेत राज ठाकरे?
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजना आहे ना त्याचे, गेल्या काही महिन्यांचे पैसे येतील कारण निवडणुका तोंडावर आहेत. या देखील महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत. यावरती जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं सुरू आहे. त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल, या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकटं, महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे, त्या बळकट आहेत, त्यांच्या हाताला काम द्या, कोणी मागितले आहेत फुकटं पैसे, गरीबाला पैसे, मजुराला पैसे, शेतकऱ्यांना वीज फुकट द्या, शेतकरी कुठे मागतोय फुकटं वीज ते फक्त विजेत सातत्य मागत आहे, राज्यात कोणीच फुकट काही मागत नाही, यांना त्या सवयी लावायच्या आहेत.
एकदा का फुकट घेण्याची सवय लागली की, मग सगळे राजकीय पक्ष त्या पध्दतीने वागायला लागतात. त्यानंतर सर्वजण त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवत जातात. नागडा होणार आहे महाराष्ट्र. आपण राज् म्हणून काही विचार करणार आहोत की नाही, या सर्वातून हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरेंनी यांनी यावेळी म्हटलं आहे.
आम्हाला सत्ता दिली तर महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही : राज ठाकरे
निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. सत्तेतील आणि विरोधातील लोक निवडणुकीसाठी काहीही करतील. उद्या जेव्हा हे राजकीय पक्ष पैसे वाटतील तेव्हा ते नक्की घ्या कारण तुमचे पैसे आहेत आणि मतदान मनसेच्या उमेदवाराला करा. एकदा मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.