एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Konkan Rain | रत्नागिरी, सिंधुदुर्गात जनजीवन अद्यापही विस्कळीत; भाजीपाल्याचा तुटवडा, तर अनेक रस्ते बंद
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात अद्यापही पाऊस कायम आहे, परिणामी जिल्ह्यात दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सिंधुदुर्गातील अनेक रस्ते बंद असून काही गावांशी संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी/सिंधुदुर्ग : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचं पाणी अद्याप ओसरलेलं नाही. त्यामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात अद्यापही पाऊस कायम आहे, परिणामी जिल्ह्यात दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सिंधुदुर्गातील अनेक रस्ते बंद असून काही गावांशी संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी पाऊस अपडेट
कोल्हापूर-रत्नागिरी आंबा घाटात महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरु
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबाघाटातील रस्ता मधोमध खचला असून दोन दिवस वाहतूक बंद होती. जिल्ह्यात होणारा दुधाचा आणि भाज्यांचा तुटवडा पाहून आज घाटातून एकेरी वाहतूक सुरु केली.
चिपळूण-खेड पावसाचा जोर कमी, नद्यांचं पाणी ओसरायला सुरुवात
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड आणि चिपळूण याठिकाणच्या जगबुडी आणि वाशिष्टी या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाली असून तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर महामार्गावरील संगमेश्वर बावनदी आणि आरवली येथील गडनदी या नद्यांचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.
या ठिकाणी दुधाचा आणि भाज्यांचा तुटवडा असल्याने कराड-कोल्हापूर-आंबाघाट मार्गे वाहतूक केली जात आहे.
पावसाची रिपरिप सुरुच, राजापूरमध्ये अजूनही पुराचं पाणी
चिपळूण, खेड या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरी राजापूर, लांजा याठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. राजापूरच्या काही सखल भागात अजूनही पुराचं पाणी असल्याने तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
राजापुरातील काकये धरणाला भेगा
जिल्हातील काही धरणे मातीची असून सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यातील एक राजापूरमधील कोंडवशी गावातलं काकये धरण. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ओव्हरफ्लो झालं आहे. या धरणाला मोठ्या भेगा पडल्या असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणालगतच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सिंधुदुर्ग पाऊस अपडेट
मुंबई-गोवा सागरी महामार्ग बंद
मुसळधार पावसामुळे उद्धवलेल्या पूरस्थितीमुळे केळुस गावात पाणी आहे. त्यामुळे मुंबई-गोवा सागरी महामार्गावरील वाहतूक चौथ्या दिवशीही बंद आहे. तर भनसाळ नदीच्या पुराचे पाणी ओसरल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
अनेक रस्ते बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील पाडगाव आणि कुडाळमधील निळेली धरणाचे दरवाजे उघडल्याने कुडाळ तालुक्यातील आंबेरी फुलावर पाणी आलं आहे. कुडाळमधील कर्ली नदीची पूरस्थिती कायम आहे. तर तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने बांदा, दोडामार्ग रस्ता बंद करण्यात आला आहे. तसंच मनेरी गावात पूलावरुन पाणी जात असल्याने तो रस्ताही बंद केला आहे.
27 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला
याशिवाय कुडाळ तालुक्यातील माणगावमधील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलावरुन गेल्या चार दिवसापासून पाणी जात असल्याने 27 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. बांदा, खारेपाटण, माणगाव बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे.
आतापर्यंत 150 जणांना वाचवण्यात यश
वेंगुर्ले, केळुस गावातील 40 ते 50 लोक गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत. मात्र प्रशासनाकडून अजून कोणत्याही प्रकारची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. तर कुडाळ सरंबळ गावात पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 150 जणांना वाचवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement