शिंदेंच्या आमदाराचा युतीला दे धक्का; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचे दंड थोपटले
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपण युतीच्या नव्हे तर आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने केलाय.
Kishor Patil : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपण युतीच्या नव्हे तर आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांनी केला आहे. त्यामुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जे सातत्याने आपल्या विरोधात लढले अशांच्या सोबत युती करणार का? असा सवाल करत शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदार संघात आमची शिवसेना ही स्वबळावर लढणार असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये जळगाव जिल्ह्यात पहिला मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे.
आपल्या विरोधात लढले ते पुन्हा एकत्र येऊन आपल्या पराभवासाठी प्रयत्न करणार
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका संदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे. आगामी काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी महा युतीच्या माध्यमातून लढण्याच्या बाबत महायुतीचे नेते सांगत असले, तरी आज पर्यंत जे आपल्या विरोधात लढले, ते पुन्हा एकदा आपल्या विरोधात एकत्र येऊन आपला पराभव कसा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा सोबत आपण युती कशी करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पाचोरा भडगाव मतदारसंघात महायुती नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार
आपल्या पाचोरा भडगाव मतदार संघात आपण महायुती नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार आहोत. त्यामध्ये आपला शिवसेनेचा भगवा झेंडा विजयी झालेला दिसेल,अशी भूमिका शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केली आहे. राज्यात महायुती मध्ये पुढील काळात काय चित्र राहू शकते याचा अंदाज या घटनेतून दिसू लागला आहे.
पुढच्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचीलींना वेग आला आहे. दरम्यान, महायुतीचे काही नेते एकत्र निवडणुका लढणार असल्याचे सांगत आहेत, तर काही नेते स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळं युतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
























