(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईच्या मढमधील बेकायदा फिल्म स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू; आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या आशीर्वादानंच उभारले स्टुडिओ, किरीट सोमय्यांचा आरोप
. प्रतीकात्मक कुदळ आणि फावडं घेऊन सोमय्या पाडकामाच्या ठिकाणी पोहोचले. आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानंच हे स्टुडिओ उभे राहिले असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
मुंबई: मुंबईतील मढ परिसरातले अनधिकृत फिल्म स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू आहे. एक हजार कोटींचे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं गुरुवारी दिला. आम्ही फक्त तात्पुरतं बांधकाम करण्यास परवानगी दिली होती. मात्र त्याजागी कायमस्वरुपी स्टुडिओ उभारण्यात आले, असं हरित लवादानं आपलया निर्णयात म्हटले आहे. प्रतीकात्मक कुदळ आणि फावडं घेऊन सोमय्या पाडकामाच्या ठिकाणी पोहोचले. आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानंच हे स्टुडिओ उभे राहिले असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या बांधकामाला परवानगी दिली होती. स्टुडिओ मालकाने कोर्टात याचिका रद्द करण्याची मागणी केली. राजकारण बाहेर करा, असं याचिकाकर्त्यांना न्यायालयाने सुनावले. मुंबई महानगरपालिकेच्या आशिर्वादाने या बेकायदेशीर स्टुडिओला परवानगी मिळाली होती त्यांची चौकशी झालीच पाहिजे. आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या भ्रष्टाचाराचं स्मारक उद्ध्वस्त झाले आहे.
मढ मालाड येथील अनधिकृत स्टुडिओंवर आज सकाळी हतोडा !
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 7, 2023
असलम शेख, आदित्य ठाकरे, ठाकरे सरकारचा आशीर्वादाने 2021 मधे डझन भर अनधिकृत स्टुडिओ बांधण्यात आले
आज पासून तोडण्याचे काम सुरू
मी देखील 11 वाजता visit करणार @BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/bkfLmiC4Qv
नियमांचं उल्लंघन करुन 49 स्टुडिओचं बांधकाम, किरीट सोमय्यांचा आरोप
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांनुसार, "मढ, मार्वेमध्ये 49 फिल्म स्टुडिओमध्ये कथित भ्रष्टाचार झाला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला आहे. तसंच यामध्ये CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बनावट कागदपत्रे, खोट्या परवानगीच्या मदतीने हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये बीएमसी आणि एमसीझेडएमए (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी)च्या अधिकाऱ्यांसोबतही संगनमत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली. मी केंद्र सरकारकडे जात तक्रार केल्यानंतर त्यांनी विचारलं कोणत्या नियमांतर्गत परवानगी दिली. 22 फेब्रुवारी 2021 रोजी पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली ती बेकायदेशीर होती. दुसरीकडे परवानगी 6 महिन्यासाठी होती आणि 19 महिने झाले आहेत. स्टुडिओ समुद्रात बांधले आहेत, त्यामुळं हे तर तुटणारच", असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :