खवले मांजराची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक, चिपळूणमध्ये वनविभागाची कारवाई
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ असे जिवंत खवले मांजर विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खेड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर खेड रेल्वे स्टेशनजवळ वन विभागानेकडून सापळा रचण्यात आला.

चिपळूण : खेड- चिपळूण महामार्गावर बुधवारी वन विभागाने सापळा रचून खवले मांजराची विक्री करणाऱ्या सहा शिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्या दोन मोटरसायकलही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ असे जिवंत खवले मांजर विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खेड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर खेड रेल्वे स्टेशनजवळ वन विभागानेकडून सापळा रचण्यात आला. विक्रीसाठी आल्यावर आणलेल्या पोत्यामध्ये जिवंत खवले मांजर असल्याची खात्री झाल्यावर तत्काळ झटापट करून चार जणांना त्यांच्या चार चाकी गाडीमध्येच ताब्यात घेण्यात आले. तर इतर दोन जणांना जवळपासच्या भागातून ताब्यात घेण्यात आले.
26 मार्च रोजी अध्यक्ष जिल्हा व्याघ्र कक्ष समिती तथा जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी खवले मांजर तस्करी रोखण्यासाठी वन आणि पोलीस विभागास समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत शहा आणि पोलीस विभागाने वनविभागास मोलाचे सहकार्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाने सापळा रचुन अवैध तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केली. त्यामध्ये महेश शिंदे, उद्धव साठे, अंकुश मोरे, समीर मोरे, अरुण सावंत, अभिजीत सागावकर या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींकडून तस्करी करण्यासाठी आणलेले खवले मांजर तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. खवल्या मांजर ही एक दुर्मिळ सस्तन प्राण्यांची प्रजाती आहे. वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत या प्राण्याला वाघा एवढे संरक्षण दिले गेले आहे.
जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी खवल्या मांजराची होते. खवले मांजर हा प्राणी वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत अनुसूची 1 मध्ये येत असून सदर प्राण्याची शिकार करणं, तस्करी करणं किंवा जवळ बाळगणं यासाठी सात वर्षे सक्त कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. या कारवाईमध्ये दिपक खाडे विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण, सचिन निलख सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण, वैभव बोराटे परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण, अ. रा.दळवी वनपाल खेड, रोहन भाटे माजी मानद वन्यजीव रक्षक सातारा हे सहभागी झाले होते. पुढील तपास वनक्षेत्रपाल दापोली वैभव बोराटे हे सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. नागरिकांनी आपल्या आजूबाजूला वन्यजीव शिकार आणि तस्करी होत असल्यास वनविभागास कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
