विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला, आजपासून 24 तास दर्शन
आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे
पंढरपूर: कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. आज सकाळी अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहेत. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते.
आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे . त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता, मंदिरही 24 तास खुले राहायचे. मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा. यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त कार्तिकी यात्रा होणार असल्याने संपूर्ण यात्रा काळात आजपासून लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे .
आज मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , माधवी निगडे , शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते पूजेनंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला. चोवीस तास दर्शनाला उभारून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारतीपर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजता मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याचसाठी दर्शन बंद राहणार असून उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे.
सर्वसाधारणपणे यात्रा काळात म्हणजे मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे . यामुळे यात्राकाळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे देवाच्या पायावर दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. आषाढी वारीला ज्या प्रमाणे भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला येतात त्याचप्रमाणे कार्तिकी यात्रेलाही भाविकांची मोठी गर्दी असते. या दोन्ही एकादशीच्या दरम्यानच्या काळात चातुर्मास पाळला जातो.