Kamada Ekadashi 2022 : अंतःकरणातील सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करणारी कामदा एकादशी; हरी हरा भेद नाही सांगणारी चैत्री यात्रा
Kamada Ekadashi 2022 : चैत्र शुद्ध एकादशीला 'कामदा एकादशी' म्हणतात. यात काम + दा अशी याची फोड असून काम म्हणजे अंतरीची मनोकामना किंवा इच्छा आणि दा म्हणजे पूर्णत्वाला जाणं.
Kamada Ekadashi 2022 : मराठी नववर्षात येणारी वारकरी संप्रदायातील पहिली यात्रा म्हणजे, चैत्री यात्रा (Chiatra Ekadashi 2022) होय. तसं मराठी जणांचा चैत्र महिना हा जत्रा आणि यात्रांचा महिना अशी ओळख असते. या महिन्यात गावोगावच्या यात्रा, जत्रा भरत असतात. या यात्रेची दुसरी ओळख म्हणजे, चैत्र यात्रेमधून 'हरी हरा भेद नाही', हा संदेश वारकरी संप्रदाय जगाला देतो. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ही वारी मोठ्या देवाची अर्थात महादेवाची असते. शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या विवाहातील महत्वाचा दिवस चैत्र शुद्ध एकादशीला असतो. त्यामुळे वारकरी या दिवशी विठुराया अर्थात हरी आणि महादेव अर्थात हर या दोघांचे दर्शन करीत असतात. म्हणूनच वारकरी संप्रदायात
हरी हरा भेद!
नाही नको करू वाद!!
हे प्रमाण मानलं जातं. चैत्र शुद्ध एकादशीला 'कामदा एकादशी' म्हणतात. यात काम + दा अशी याची फोड असून काम म्हणजे अंतरीची मनोकामना किंवा इच्छा आणि दा म्हणजे पूर्णत्वाला जाणं, म्हणून या एकादशीला कामदा अर्थात अंतःकरणातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्याचा सामर्थ्य असणारी असं म्हणालं जातं. तसं पहिलं तर या इच्छा दोन प्रकारच्या असतात. पहिली प्रापंचिक इच्छा असते, मात्र ही पूर्ण झाली या इच्छा सतत वाढत जाणाऱ्या असतात आणि यातून व्यक्ती समाधान हरवून बसतो. तर दुसरी इच्छा ही पारमार्थिक असते, ही इच्छा पूर्ण झाली की व्यक्ती समाधानी होतो, त्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,
कृतकृत्य झालो! इच्छा केली ती पावलो!!
म्हणजेच मी जी जी इच्छा केली होती, ती परिपूर्ण झाली आणि परमात्मा मिळाल्यानं कृतकृत्य झालो. आता कोणतीही इच्छा उरली नाही अशा शब्दात पारमार्थिक सुखाचं महत्व सांगितलं आहे. किंवा दुसऱ्या एका दाखल्यात तुकाराम महाराज म्हणतात,
काम नाही, काम नाही!
झालो पायी रिकामा!!
यात पहिले काम नाही याचा अर्थ सर्व प्रापंचिक मनोकामना पूर्ण झाल्या आणि दुसरे काम नाही याचा अर्थ सर्व पारमार्थिक मनोकामना पूर्ण झाल्या, म्हणून आता निरपेक्ष झालो. अशा शब्दात तुकाराम महाराजांनी या कामदा एकादशीची महती आपल्या अभंगातून सांगितली आहे.
चैत्रातील वारीला 'पळती यात्रा'ही म्हणतात. याचं कारण या यात्रेला येणारा भाविक हा महादेवाचा विवाह आणि विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतो. त्यामुळे या यात्रेच्या वेळी अनेक पवित्र कावड घेऊन भाविक पंढरपूरला येतात. चंद्रभागा स्नान करून देवाचं दर्शन घेतात आणि शिखर शिंगणापूरकडे रवाना होतात. शंकर पार्वतीचा विवाह सोहळ्यासाठी ही मंडळी शिखर शिंगणापूरला जात असतात. या विवाहाला साक्षात विठुरायाच गेले आणि लग्नात पंचपक्वानांचे भोजन केलं, अशी आख्यायिका वारकरी संप्रदायात सांगितली जाते. त्यामुळेच चैत्र शुद्ध एकादशीला उपवास असूनही विठुरायाला दुपारी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात येतो. विशेष म्हणजे, देवाला सकाळी उपवासाची खिचडी आणि संध्याकाळीही उपवासाची भगर यांचा नैवेद्य असतो. मात्र दुपारच्या भोजनात हा पुरणपोळीचा महानैवेद्य देण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही पाळली जाते.
चैत्री यात्रेसाठी मुंबई, कोकण, कोल्हापूर भागांसह कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविक येत असतात. तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त चैत्री यात्रा साजरी केली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात असल्यानं राज्य शासनाच्या वतीनं राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना यंदाची चैत्री यात्रा निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे. तसेच, विठुरायाची भेट घेता येणार आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशीची महापूजा आणि इतर परंपरा मोठ्या उत्साहात पार पाडल्या जाणार आहेत. चैत्री यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा कामदा एकादशीनिमित्त द्राक्षांनी सजविण्यात आला आहे. आजच्या या यात्रेचे औचित्य साधत पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील शेतकरी संजय तिकोरे यांनी आपल्या शेतातील द्राक्षे आणून मंदिराच्या सजावटीची सेवा अर्पण केली आहे.