Coaching Center Guidelines: ही तर हुकूमशाही, ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचंय त्यांना जाऊ द्या, त्यांना कशाला थांबवता?; जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे; त्यांना थांबवता कशाला? या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार आहे, याचा अंदाजच न केलेला बरा, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
Jitendra Awhad on Guidelines For Coaching Centers: मुंबई : 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये (Coaching Centres) प्रवेश देता येणार नाही, अशा मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या (Central Government Guidelines) वतीनं जारी करण्यात आल्या आहेत. नियमांचं उल्लंघन झाल्यास क्लासची मान्यता रद्द करण्याचा इशाराही केंद्र सरकारनं (Central Government) दिला आहे. केंद्र सरकारच्या याच निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीका केली आहे. ही तर हुकूमशाही, असं म्हणत आमदार आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे; त्यांना थांबवता कशाला? या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार आहे, याचा अंदाजच न केलेला बरा, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
ही तर हुकूमशाही, ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचंय त्यांना जाऊ द्यावं, त्यांना कशाला थांबवता? : जितेंद्र आव्हाड
केंद्र सरकारनं 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचं जाहीर केल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "असे समजते की, 16 वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्याला यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही. कारण की, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच, कोणी कोचिंग क्लासेस घेतल्यास त्यांना एक लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये पाठवून त्यांचा जादा अभ्यास करून घेण्याची पालक - शिक्षकांची मानसिकता असते. कोचिंग क्लासेस हे नोकरदार आई, वडील- पालकांनाही साह्यभूत ठरत आलेले आहेत. सारासार विचार करता, कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा होते. असे असताना 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकूमशाही आहे. ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे; त्यांना थांबवता कशाला? या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार आहे, याचा अंदाजच न केलेला बरा ! मध्यंतरी घरगुती ट्यूशन्स बंद केल्या होत्या. इथपर्यंत यांची मजल जाईल की म्हणतील, आता घरातच रहा!"
असे समजते की, १६ वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्याला यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही. कारण की, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच, कोणी कोचिंग क्लासेस घेतल्यास त्यांना १ लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 19, 2024
कोचिंग क्लासेस संदर्भातला केंद्राचा निर्णय नेमका काय?
कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नव्या मार्गदर्शन सूचनांनुसार, क्लासेसमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणं बंधनकारक असणार आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द करण्याचा इशारा केंद्र सरकारनं दिला आहे.
खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं पावले उचलली आहेत. कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना करणे सर्व क्लासेस ना बंधनकारक असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI