दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारडून वेगळा विचार : जयंत पाटील
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार त्यांनादेखील मदत करेल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
पुणे : वर्षभरात आधी दुष्काळ, महापूर आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे राज्यातल्या शेतकऱ्याचे भयंकर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता थोडी कमी झाली होती. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार करण्यात आला नव्हता, त्यामुळे ही शेतकरी कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप अनेक नेत्यांकडून होऊ लागला आहे. यावर राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार त्यांनादेखील मदत करेल.
जयंत पाटील म्हणाले की, दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि 2 लाखांपुढे कर्ज असणाऱ्यांचा आम्ही वेगळा विचार करत आहोत. राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे इतर नेते त्यासाठी विचार करत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही एक योजना आणणार आहोत. तसेच दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, त्यांनी घेतलेले एकूण कर्ज, आणि त्यावरील व्याजाची माहिती आम्ही गोळा करत आहोत. ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त आहे, आमचं सरकार त्यांनादेखील न्याय देईल. शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत, याचीदेखील काळजी घेतली जाईल.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा शासनादेश काल (27 डिसेंबर) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2015 नंतर ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतले असेल त्या शेतकऱ्यांचे ते पीक कर्ज पुनर्गठित करुनसुद्धा सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असेल तर त्यांना दोन लाखापर्यंत थेट खात्यात मदत देण्यात येणार आहे. याचा अर्थ एप्रिल 2015 पूर्वी ज्यांचे कर्ज असेल त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला नाही. म्हणजेच त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. या शासन आदेशामध्ये क्रमांक पाच वर स्पष्टपणे एक गोष्ट नमूद केली आहे, ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज मुद्दल व व्याजासह दोन लाखांपेक्षा अधिक झाले असेल त्यांना या पीक कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी नेते राज्य शासनावर संतापले आहेत.
पाहा काय म्हणाले जयंत पाटील?
कर्जमाफीच्या धोरणात बदल करा, नाहीतर वेगळ्या भाषेत सांगू, राजू शेट्टींचा सरकारला इशारा 'या' शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही (शासनादेश पाहा)