जयंत पाटलांची तटकरेंना मिठी, आव्हाड-फडणवीसांची गुजगोष्ट; कार्यकर्त्यांनो शहाणे व्हा, नेते एकमेकांच्या गळ्यात आणि तुम्ही....
Maharashtra Politics : राजकारणात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत असं सांगत हे नेते सोयीनुसार एकत्र येतात आणि सोयीनुसार बाजूला होतात. पण राजकारणासाठी एकमेकांच्या उरावर बसणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय?
Maharashtra Monsoon Session : महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही इतर राज्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहे आणि त्याची अनेकदा प्रचिती येते. उत्तरेकडील राज्यांत किंवा दक्षिणेकडील राज्यांत राजकीय विरोधकांचे वैर हे इतक्या टोकाला जातं की ते एकमेकांचा जीवही घ्यायला मागेपुढे बघत नाहीत. पण महाराष्ट्र त्याला अपवाद आहे आणि आताही ते दिसून आलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि सुनील तटकरे एकमेकांच्या गळ्यात पडले आणि दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि फडणवीस हसायला लागले.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भिडत असतात. मात्र सभागृहाबाहेर आपसातले संबंधही जपत असतात. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आज जयंत पाटील आणि सुनील तटकरे पहिल्यांदाच चर्चा करताना आढळून आले. विधान भवनातील इमारतीत एका कोपऱ्यात दोघांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. हे दोघेही हसत-हसत चर्चेत रंगले होते. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, आमची मैत्री ही राजकारणापलिकडे आहे. माझे महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांमध्ये चांगले मित्र आहेत.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुरूवातीला दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर टीका सुरू झाली. त्यानंतर मात्र दोन्ही बाजूंनी सबुरीची भूमिका घेतल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाने दोन वेळा शरद पवारांची भेट घेऊन चर्चेची दारं खुली असल्याचे संकेत दिले.
आव्हाडांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितलं...
दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर राजकीय विरोधक. राजकारणापलिकडे जाऊन यांचा विचारधारेचाही विरोध पहायला मिळतोय. आज अधिवेशनाच्या दरम्यान हे दोन नेते एकमेकांसमोर आले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि फडणवीस जोरजोरात हसायला लागले. याची भेटगाठ अवघ्या काही सेकंदाची होती, पण हे चित्र महाराष्ट्राला सुखावणारं होतं, राजकारणापलिकडे जावून महाराष्ट्राची संस्कृती जपणारं होतं.
कार्यकर्त्यांचं काय?
राजकारणात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत असं सांगत हे नेते सोयीनुसार एकत्र येतात आणि सोयीनुसार बाजूला होतात. पण बारीकसारीक गोष्टीवरून, नेत्याच्या आदेशावरून एकमेकांची टाळकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय असा सवाल पडतो.
नेत्यांनी आपली राजकीय संस्कृती जपलीय. ते कुठेही गेले तरी, कितीही राजकीय टीका केली तरी समोर आल्यानंतर एकमेकांना आदर देणं, चर्चा कायम ठेवणं किंवा परतीचे मार्ग खुले ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आणि त्याची प्रचिती या नेत्यांना रोज येते. त्यामुळे संयम ठेवण्याचा शहाणपणा ते करतात. पण कार्यकर्त्यांचं काय?
आपल्या नेत्याने पक्ष बदलला तर कार्यकर्त्यांचा उत्साह हा बघण्यासारखा असतो. तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी आपले साहेब कसे बरोबर आहेत याची गणितं सांगत बसतो. पण हे करताना नेत्याला होणारा विरोध किंवा त्याच्यावर होणारी टीका याला सहन होत नाही. त्यामुळे हा कार्यकर्ता कधी दगड उचलेल आणि विरोधी कार्यकर्त्यांचं डोकं फोडेल याचा काही नेम नाही. आपल्या नेत्याने एखाद्याला विरोध केला म्हणजे विरोधकाच्या ऑफिसच्या काचा फुटल्याच म्हणून समजा... असाच प्रकार गावागावात दिसतोय.
महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकीय संस्कृती पाहता तिकडे उद्या ठाकरे गट आणि शिंदे गटही एकत्र येतील... राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मग या नेत्यांसाठी रस्त्यावर एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय होणार? यांच्यात मनभेदाचा ओरखडा ओढलेला नसतो.... यांच्यात मनभेदाची दरी निर्माण झालेली असते, ती कशी बुजणार?
त्यामुळे... कार्यकर्त्यांनो शहाणे व्हा... तुमच्या नेत्यांप्रमाणे डिप्लोमॅटिक व्हा आणि राजकारण करा. नेत्याने पक्ष बदलला म्हणून एकमेकांच्या उरावर बसू नका... संवादाची आणि चर्चेची दारं कायम खुली ठेवा. नाहीतर सध्याचं राजकारण पाहता तुम्ही बाद झालाच म्हणून समजा.