Jayant Patil : बारामतीत दुसर्यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
Majha Vision Majha Maharashtra : बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची कुणी केली? प्रतिष्ठा दुसर्यांची पणाला लागली आहे. सुप्रियाताई 100 टक्के निवडून येणार आहेत, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार लढत होत आहे. नुकतेच मतदान झाले असले तरी या लढतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) बाजी मारणार की सुनेत्रा पवार (Sunetra pawar) गुलाल उधळणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बारामतीतून सुपिया सुळे 100 टक्के विजयी होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात मतदान 7 मे रोजी पार पडले आहे. बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) एकूण 56.97 टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटात बारामतीच्या निवडणुकीवरून चांगलीच जुंपली आहे. आता जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुप्रिया ताईंचा 100 टक्के विजय होणार
जयंत पाटील म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची कुणी केली? प्रतिष्ठा दुसर्यांची पणाला लागली आहे, असा टोला अजित पवारांना लगावत सुप्रिया ताई या बारामतीतून 100 टक्के काय तर 200 टक्के निवडून येणार आहेत. त्यामुळे यात प्रतिष्ठा नाहीच, असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
अजितदादा आणखी पाच-सात दिवस थांबले असते तर...
ते पुढे म्हणाले की, अजितदादांची समोर जाऊन प्रगती झाली नाही. त्यांची प्रतिमा खराब होणार आहे हे त्यांना माहिती असावे. तरी देखील त्यांना असे पाऊल उचलावे लागले आहे. माझ्यात आणि त्यांच्यात सुप्त लढाई वगेरे काहीच नव्हती. मुंबईतील मेळाव्यात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा प्रदर्शित केली होती. अजितदादा आणखी पाच-सात दिवस थांबले असते तर त्यांची इच्छा पवार साहेब पूर्ण करणारच होते, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीवर काय म्हणाले जयंत पाटील?
राष्ट्रवादीच्या फुटीवर जयंत पाटील म्हणाले की, असे कधीच वाटले नव्हते की राष्ट्रवादीत फूट पडेल. राष्ट्रवादीत एक कुटुंब म्हणून पवार साहेबांनी सगळ्यांना जपले आहे. सगळ्यांच्या उणीवा झाकून ठेवण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी नेहमीच केला आहे. सगळ्यांना प्रोत्साहन देऊन नवीन नेते करण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला आहे. पण शेवटी आमचा पक्ष फुटला. पक्ष कशामुळे फुटला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा