Jalgaon News : अन् ऊर्जा मंत्री राहणार त्याच विश्राम गृहातील बत्ती गुल, कर्मचाऱ्यांची तारांबळ
Jalgaon News : ऊर्जा मंत्री नितीन राऊत मुक्कामाला थांबणार असणाऱ्या विश्राम गृहातीलच वीज गेल्याने हा विषय चांगलाच चर्चेला आला आहे. ओव्हर लोडिंग झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Jalgaon News Update : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोळशाच्या तुटवड्यामुळे लोडशेडिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता याचा फटका राज्याच्या उर्जा मंत्र्यांनाच बसला आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) जळगावमध्ये ज्या विश्राम गृहावर मुक्कामाला थांबले त्याच विश्राम गृहाचा काही काळासाठी वीजपुरवठा खंडित झाल्याचे समोर आले आहे.
नितीन राऊत सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते भुसावळ येथील औष्णिक केंद्राच्या विश्राम गृहात थांबले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत हे गुरूवारी रात्री उशिरा प्रवास करून आल्यानंतर त्यांनी विश्राम गृहात प्रवेश केला. परंतु, विश्राम गृहात त्यांनी प्रवेश केल्यानंतर काही वेळातच विश्राम गृहाचा वीज पुरवठा खंडित झाला. उर्जा मंत्र्यांच्याच समोर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे औष्णिक केंद्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
ऊर्जा मंत्र्यांच्या विश्राम गृहातीलच वीज गेल्याने हा विषय चांगलाच चर्चेला आला आहे. ओव्हर लोडिंग झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वीज खंडित झाल्यानंतर काहीवेळात विश्राम गृहातील अधिकाऱ्यांनी हा वीज पुरवठा सुरळीत केला.
दरम्यान, राज्यात गेल्या 22 दिवसांपासून कोठेही लोडशेडिंग नाही आणि यापुढेही ते होणार नाही अशी माहिती कालच नितीन राऊत यांनी दिली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांनाच या प्रकाराचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.
"सध्या लोडशेडिंगबाबत ज्या चर्चा आहेत त्या निवळ वावड्या उठविण्यात येत आहेत. काही ठिकाणी काही वेळेसाठी वीज पुरवठा खंडित झाला तर त्याला काही कारणे असतात. जास्त लोड आल्याने आणि डिपीवर उष्णता वाढल्यामुळे वीज बंद पडते, याचा अर्थ त्याला लोडशेडिंग सुरू आहे असं म्हणता येणार नाही, असं नितीन राऊत यांनी या प्रकारानंतर म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
22 दिवसांपासून लोडशेडिंग नाही आणि पुढेही होणार नाही ; ऊर्जामंत्री नितीन राऊतांची माहिती