जळगावमधील रहिवासी असलेले उद्योजक सर्वेश मणियार यांची आफ्रिकेत हत्या
जॉर्डन मुबल्स नावाने सर्वेश मणियार यांचे तीन प्लास्टिक कारखाने हे आफ्रिकेतील मडागास्कर जिल्ह्यात आहेत. गेल्या 20 वर्षांपासून सर्वेश मणियार यांनी आपला उद्योग या ठिकाणी यशस्वीरित्या वाढवला होता.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेले आणि व्यवसायानिमित्ताने वेस्ट आफ्रिकेच्या मादागास्कर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या उद्योजक सर्वेश मणियार यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आफ्रिकेतील राहत्या घरातच त्यांची हत्या करण्यात आली आहे. 14 जानेवारीच्या रात्री ही घटना घडली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. जॉर्डन मुबल्स नावाने सर्वेश मणियार यांचे तीन प्लास्टिक कारखाने हे आफ्रिकेतील मडागास्कर जिल्ह्यात आहेत. गेल्या 20 वर्षांपासून सर्वेश मणियार यांनी आपला उद्योग या ठिकाणी यशस्वीरित्या वाढवला होता. 14 जानेवारी रोजी ते आपल्या कारखान्यातील एका कर्मचाऱ्या सोबत चहा पिण्यासाठी आपल्या घरी आले होते. त्यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या आठ जणांनी त्यांच्या राहत्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेटवरील सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याला जागेवर बांधून ठेवलं. त्यानंतर आठही जणांनी घरात प्रवेश करत सर्वेश यांचेही हातपाय बांधून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीररित्या जखमी केले.
या हल्ल्यात सर्वेश मणियार गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आल्यावर मारेकऱ्यांनी घरातून पळ काढला. या घटनेनंतर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी त्यांची सुटका करून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सर्वेश यांच्या हत्येच्या पाठीमागे व्यावसायिक स्पर्धा असू शकते असा अंदाज त्यांचे वडील श्रीकांत मणियार यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेच्या संदर्भात मादागास्कर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती श्रीकांत मणियार यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा मृतदेह भारतात आणून अंत्यसंस्कार करणे अवघड असल्याने मादागास्कर या ठिकाणीच काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. सर्वेश मणियार यांच्या हत्येनंतर उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे.























