Uddhav Thackeray : काकांच्या साथीला पुतण्या, जयदेव ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरेंसोबत
Uddhav Thackeray : जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र जयदीप यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं यामध्ये आणखी स्पष्टता आली होती. ठाकरे आणि शिंदे गटाचे दसरा मेळावे पार पडले. यावरून दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. यावेळी जयदेव ठाकरे आणि निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुटुंबातील कुणीही नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. आता जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र जयदीप यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
बाबांचं माहीत नाही, मी मात्र उद्धव काकांसोबतच राहणार, अशी प्रतिक्रिया जयदीप ठाकरे यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे. उद्धव काकांनी राजकीय जबाबदारी दिल्यास राजकारणात सुद्धा सक्रिय होईल, असेही जयदीप ठाकरे म्हणाले.
एबीपी माझासोबत बोलताना जयदीप म्हणाले की, प्रत्येकाचं एक मत आणि भूमिका असते. आता बाबा तिथे का गेले ? हे तेच सांगू शकतील. माझं क्लिअर होतं की, मला उद्धव काकांनाच सपोर्ट करायचा आहे आणि खरी शिवसेना जी उद्धव काकांसोबत आहे तीच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष मोठा केला. अनेकांना मोठा केलं. त्यांनी ते विसरू नये, आजोबा असते तर त्यांना या गोष्टीचा खूप त्रास झाला असता. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी एकत्र होतं, पण बाबांनी ही भूमिका का घेतली ते त्यांनाच माहिती, असे जयदीप ठाकरे म्हणाले.
त्यांनी चूक केलं की बरोबर? ते त्यांना माहिती. पण मी बरोबर करतोय हे मला माहिती आहे. उद्या जर मला उद्धव काकांनी काही जबाबदारी दिली तर मी ती स्वीकारेल. जर संधी दिली तर मी राजकारणात येण्यात उत्सुक आहे, असेही जयदीप यांनी स्पष्ट केलं.
बाबा, त्या व्यासपीठावर जाणार हे मलाच काय कोणालाच माहीत नव्हतं, नक्कीच आश्चर्याचा धक्का होता. मी खूप दिवस झाले बाबांच्या संपर्कात नाही, मी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात आलो. त्याला आईचा सुद्धा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना वेळ घेऊन मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलणार आहे. कठीण काळात कुटुंबियांनी एकत्र यायला हवं, असे जयदीप ठाकरे म्हणाले.
आजोबांचा फारसा सहवास लाभला नाही, मात्र त्यांना या गोष्टीचा त्रास झाला असता. माझ्या आईचे संबंध राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांसोबत चांगले आहेत. त्यांनी केलेली मदत मी कधीही विसरत नाही, दोघांची भाषणे मी ऐकतो, असे जयदीप ठाकरे म्हणाले.

























