राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु, अनेक ठिकाणी लालपरी प्रवाशांविना धावली!
राज्यात आजपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु झाली. परंतु अनेक एसटी बस डेपोमधील लालपरी मोकळीच धावत असल्याचं किंवा एखाद-दुसरा प्रवासी एसटीमधून प्रवास करत असल्याचं चित्र आहे.
पंढरपूर/कोल्हापूर/वाशिम : राज्यात आजपासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. परंतु राज्यातील अनेक एसटी बस डेपोमधील लालपरी मोकळीच धावत असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी एखाद-दुसरा प्रवासी एसटीमधून प्रवास करत असल्याचं चित्र आहे.
पंढरपूर - कोरोनाच्या भीतीने प्रवाशांची बसकडे पाठ राज्य सरकारने आजपासून आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरु केल्यानंतर कोरोनाच्या भीतीने प्रवाशांनी बस सेवेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. आज सकाळीपासून बहुतेक बस मोकळ्याच सोडण्यात आल्या. गेल्या पाच महिन्यापासून एसटी बसची आंतरजिल्हा सेवा बंद होती, त्यामुळे आजपासून बाहेर जिल्ह्यात जाणारे प्रवासी गर्दी करतील अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र आज सकाळपासून एखादा प्रवासी वगळता प्रवाशांनी बस प्रवास टाळल्याचे दिसत आहे. आज पहिला दिवस असल्याने प्रवासी नसले तरी हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास प्रशासनाला वाटत असला तरी सध्या मात्र लालपरी मोकळीच धावात आहे.
वाशिम - आरोग्य चाचणी अहवाल बंधनकारक केल्याने प्रवासी संख्या कमी गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या लालपरीला म्हणजे एसटीला आंतरजिल्हा प्रवासाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र वाशीममधून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना आरोग्य चाचणी अहवाल बंधनकारक केल्याने प्रवासी संख्या कमी असल्याचं चित्र आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात एक एसटी बस धावणार आहे. मात्र प्रवासी संख्या वाढल्यावर जादा बस सोडल्या जाणार आहेत
राज्यात उद्यापासून 'लालपरी' धावणार! आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी : परिवहन मंत्री अनिल परब
हिंगोली - डेपोतून सोडलेली पहिलीच बस विना प्रवासी धावली जिल्ह्याबाहेर वाहतूक सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आज हिंगोली आगारातून परभणीच्या दिशेने पहिली बस धावली आहे. मात्र प्रवासी नसल्याने ही बस विनाप्रवासी धावली आहे. वाहक आणि चालक दोघेच बसमधून परभणीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ग्रामीण भागामध्ये प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने एसटी बससेवा सुरु करणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन एसटी डेपो आहेत. कळमनुरी डेपोमधून देखील विविध ठिकाणी अकरा बस सुरु करण्यात आल्या आहेत.
ई-पासची गरज नाही गणेशोत्सवानिमित्त आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु, आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.
ST Bus | राज्यात आजपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु, सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचं पालन आवश्यक