(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harvinder Singh Rinda : दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाबाबत गुप्तचर विभागानं केला मोठा खुलासा
खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाबाबत (Harvinder Singh Rinda) गुप्तचर विभागानं मोठा खुलासा केला आहे.
Khalistani Terrorist Harvinder Singh Rinda : खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाबाबत (Harvinder Singh Rinda) गुप्तचर विभागानं मोठा खुलासा केला आहे. रिंदाने 2020 मध्ये पाकिस्तानी एजन्सी ISI च्या मदतीने भारत सोडला होता. तेव्हापासून तो स्लीपर सेलच्या मदतीने पंजाब, हरियाणा, हैदराबाद आणि महाराष्ट्रात स्फोटकांचा पुरवठा करत असल्याचे गुप्तचर विभागानं म्हटले आहे. हरविंदर सिंह रिंदा त्याची ओळख लपवण्यासाठी नेहमीच वेश बदलत असल्याचेही गुप्तचर विभागानं सांगितले आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत गुप्तचर विभागाला हरविंदर सिंह रिंदाचे सहा वेगवेगळ्या वेषातील फोटो सापडले आहेत. एजन्सींनी रिंदाचे वर्णन हे A+ स्तरावरील गुंड म्हणून केले आहे. हरविंदर सिंग रिंदावर आतापर्यंत 37 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नांदेडमध्ये 14 आणि पंजाबमध्ये 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत त्याच्या 15 साथीदारांना अटक केली आहे.
रिंदावर आत्तापर्यंत मोक्का, अपहरण आणि खुनाचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या गुन्हाच्या संदर्भात महत्त्वाच्या साक्षीदारांचीही रिंदाने हत्या केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. रिंदा हे गुन्हे करण्यासाठी स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर, स्विफ्ट अशा चारचाकी वाहनांचा वापर करत असल्याची माहितीही समोर आली आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी रिंदासोबत 27 गुंड काम करत आहेत. त्यापैकी एकाचे नाव गुरप्रीत आहे, ज्याला कर्नाल पोलिसांनी अटक केले आहे.
एक महिन्या पूर्वी नांदेडातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. संजय बियाणी हत्येप्रकरणी हरविंदरसिंग रिंदा या गुन्हेगाराचे नाव समोर आले होते. कारण संजय बियाणी यांच्या हत्येअगोदर एक वर्षापूर्वी त्यांना दोन कोटींच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी रिंदाने दिली होती. त्यानंतर अनेक वर्षानंतर रिंदा हे नाव चर्चेत आले होते. तर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर रिंदाच्या नावाने अनेक व्यावसायिकांना धमकी पत्र व थ्रेड कॉल येणे सुरू झाले होते. तर खुद्द नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनाही रिंदाने खंडणी व जीवे मारण्याचे धमकीचे पत्र समोर आले आहे.
दरम्यान, हरियाणात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) ताबा घेणार आहे. खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाच्या 4 हस्तकांना करनालमधून अटक करण्यात आली होती. दरम्यान, या दहशतवाद्यांचा म्होरक्या रिंदा सध्या पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून यापूर्वी तो लाहोरमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. तसेच, तो पाकिस्तानातून भारताविरोधात दहशतवादी कट रचत असल्याचा धक्कादायक खुलासा तपासातून झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nanded Case : हरियाणातून अटक केलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस ताबा घेणार, म्होरक्या अद्याप फरार
- Khalistani Terrorist Harvinder Singh Rinda : खलिस्तानी दहशतवादी रिंदानंच तेलंगणामध्ये RDX पाठवलं