लॉकडाऊनमध्ये नांदेडमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा 'मुलांशी गप्पा' अभिनव उपक्रम; पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाच्या 'मुलांशी गप्पा' या अभिनव उपक्रमाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान या शिक्षकाशी संवाद साधणार आहेत.
नांदेड : गेल्या दीड ते दोन वर्षापासून शाळेचे दार विद्यार्थ्यांना बंद असले तरी आद्ययावत तंत्रज्ञान, शिक्षकांची धडपड आणि विद्यार्थ्यांची आवड यातून गेल्या लॉकडाऊनच्या काळात संवाद साधला जात आहे. उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांनी 'मुलांशी गप्पा' या सदरातून 'विद्यार्थ्यांशी गप्पा' मारत ज्ञानाचे धडे दिले आहेत. या उपक्रमात राज्यातील दहा जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होतात. या उपक्रमाची खुद्द पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ही संवाद साधणार आहेत.
अर्धापूर तालुक्यातील कारवाडी जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक संतोष राऊत यांचा काय आहे उपक्रम?
जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी (ता.अर्धापूर) येथे कार्यरत शिक्षक संतोष मारुतीराव राऊत यांनी कोविडच्या काळात 'वर्क फ्रॉम होम'च्या माध्यमातून मागील 378 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत. यामध्ये केवळ कारवाडी शाळेतील विद्यार्थी नाहीत तर राज्यभरातील 10 जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जोडले आहेत. सदर उपक्रम राऊत गरुजींनी जुलै 2020 पासून सुरु केलाय.
लॉकडाऊन परिस्थिती ऑनलाइन शिक्षणाचे आव्हान लक्षात घेऊन जुलै 2020 पासून दररोज सकाळी झूम आणि गुगल मीटिंगच्या मदतीने अर्धा तास योग सराव आणि आठ ते नऊ या वेळेत शैक्षणिक अभ्यासाच्या तासिका, सायंकाळी एक तास माहिती तंत्रज्ञान तासिका, यामध्ये केवळ शैक्षणिक अभ्यास घेतला जात नसून मागील अनेक महिन्यांपासून या समूहातील विद्यार्थी उत्तम तंत्रस्नेही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आज अनेक विद्यार्थी स्वतः झूम, गुगल मिटची मीटिंग स्वतःहून घेत आहेत. एवढेच नव्हे तर इतरही अनेक अॅपची माहिती इतरांना मीटिंगमध्ये समजावून सांगत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून हजारों विद्यार्थ्यांच्या 200 च्यावर टेस्ट घेण्यात आल्या आहेत.
200 च्यावर टेस्ट झाल्या असून तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या आहेत. विशेष सांगायचे तर प्रकाश चव्हाण सरांच्या मार्गदर्शक तासिकेतून दोन विद्यार्थ्यांनी स्वतःचे अॅप्स बनवले आहेत, असा मुलांशी गप्पा समूह कोरोनाच्या लॉकडाऊन काळातील शिक्षणासाठी पालकांना मुलांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील आणि जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन घेता येते.
अभ्यासाबरोबर विविध अॅप्सचे निर्माते, कवी, लेखक, गायक, सैनिक, वैमानिक, मंत्रालय कक्ष अधिकारी, चित्रपट कलाकार, लघुपट निर्माते, शिल्पकार, चित्रकार, पत्रकार शेतकरी, भजनी, मातीचे किल्ले निर्मिती करणारे अशा अनेक व्यक्तींच्या मुलाखती आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करून पुस्तकाबाहेरचा अभ्यास विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न चालू आहे. विना दप्तराची शाळा, बांधावरील शाळा आदी 28 उपक्रम, मुलांशी गप्पा आदी उपक्रम राबविले आहेत.
संतोष राऊत 25 जुलै रोजी 'मन की बात' या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींशी संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी, 25 जुलै रोजी देशातील निवडक व्यक्तींसोबत 'मन कि बात' या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची इच्छा पूर्ण होत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदचे शिक्षक संतोष राऊत यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याची संधी मिळू शकते , असा मेसेज 'माय गव्हर्मेंट' यांच्याकडून शिक्षक संतोष राऊत यांना 17 जुलै रोजी आला आहे. त्यांनी कामाची माहिती 'माय गव्हर्मेंट'कडे पाठवली आहे. 25 जुलै रोजीच्या 'मन की बात' या कार्यक्रमात त्यांना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधता येतील, असा मेसेज पंतप्रधान कार्यालयातून आल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे.