Raju Shetti : हवामानाचे अचूक अंदाज नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, मात्र याकडं सरकारचं दुर्लक्ष : राजू शेट्टी
हवामानाचा अचूक अंदाज नसल्यानं शेती धोक्यात येऊ लागल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केलं.
Raju Shetti : हवामान खात्याच्या लहरीपणाच्या अंदाजामुळं शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामानाचा अचूक अंदाज नसल्यानं शेती धोक्यात येऊ लागल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केलं. भारतीय शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हवामान खात्याची भुमिका महत्वाची आहे. मात्र, केंद्र सरकार याकडं गांभीर्याने लक्ष देत नसल्याची टीका राजू शेट्टींनी केली. राजू शेट्टी यांनी पुणे येथील हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के.एस.होसाळीकर यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
अचूक हवामानाचं तंत्रज्ञान विकसीत करावं लागेल
दुष्काळ कसा घोषित केला जातो, तो करताना पर्जन्यमान आणि त्याचा कालावधी कसा असतो ? त्याचे निकष काय असतात ? इतर देशाप्रमाणे आपल्या देशात हवामानाची माहिती अचूक का दिली जात नाही ? ग्लोबल वार्मिंगमधील झालेल्या बदलामुळं हवामान विभाग कशा पध्दतीने काम करत आहे? हवामान विभागाची अचूक माहिती मिळण्यासाठी कोणते तंत्रज्ञान विकसित करावे लागेल? शेतीबरोबर आरोग्यासाठी हवामान विभागाची महत्वपुर्ण भुमिका ? यासह विविध विषयावर राजू शेट्टींनी डॉ. के.एस.होसाळीकर यांच्याशी चर्चा केली. अचूक हवामानाचं तंत्रज्ञान विकसीत करुन हवामान निरीक्षणाचे जाळे वाढवावे लागेल असेही शेट्टी म्हणाले.
परतीचा मान्सून समाधानकारक होईल : डॉ. के.एस.होसाळीकर
भारतीय शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हवामान खात्याची भुमिका ही महत्वाची आहे. मात्र, केंद्र सरकार याकडं गांभीर्याने लक्ष देत नाही. हवामानाचे अचूक अंदाज नसल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे शेट्टी म्हणाले. यावर्षी राज्यामध्ये परतीचा मान्सून हा समाधानकारक असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानपासून सुरु झालेला परतीचा मान्सून राज्यात सर्वदूर पाऊस होईल असे मत पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केले. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना हवामानाचे अद्यावत माहिती मिळण्यासाठी तालुक्यातील ब्लॅाक निहाय हवामान निरीक्षण केंद्रे असणे गरजेचे असल्याच होसाळीकर म्हणाले.
दुष्काळ घोषित करण्याची ब्रिटिशकालीन पद्धत बदलणं गरजेचं
गेल्या १५० वर्षाचा हवामानाची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. इतर देशाप्रमाणे आपल्या देशात हवामानाचा अंदाज अचूक न येण्यामागे त्या विषवृत देशाची भौगोलिक रचना कारणीभूत असून यामुळे त्यांचा अंदाज अचूक असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. सरासरी पाऊसाचे निकष हे जिल्हावार न काढता ब्लॉक विभागवार काढणे गरजेचे आहे. उदा. महाबळेश्वर मधे पडणाऱ्या पाऊसा मुळे सातारा जिल्ह्यातील सरासरी जास्त येते. मात्र याचा फटका खटाव माणमधील दुष्काळ प्रवण क्षेत्रामधील शेतकऱ्यांना बसतो. परिणाम स्वरुप पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार देतात. दुष्काळ घोषित करण्याची राज्य आणि केंद्र शासनाची ब्रिटिशकालीन पद्धत बदलणं जरुरी असल्याचे मत व्यक्त करत याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे राजू शेट्टी यानी सांगितले.