Independence day 2023 : स्वातंत्र्य दिन चिरायू हो! राज्यपालांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण; शहरात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह
पुण्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पुणे : भारताच्या 77 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2023) राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या हस्ते पुण्यातल्या विभागीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यानंतर, त्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यात झालेलं हे पहिलंच ध्वजारोहण होतं.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर रायगड जिल्ह्यातल्या ध्वजारोहणाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं ते पुण्यातल्या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. पुण्यातल्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राज्यपालांसोबत आधी चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आलं होतं. पण नंतर त्यांना रायगडमधल्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली. राज्यपाल रमेश बैस यांनी ध्वजारोहण सोहळ्यानंतर, कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांची भेट घेतली. त्यात काही दिव्यांगाचाही समावेश होता.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्या दिन साजरा करण्यात आला. पुण्यातील पोलीस मैदान आणि बाकी प्रशासकीय कार्यलयात ध्वजारोहन करण्यात आलं. शहरात सगळीकडेच स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला.
शहरातील इमारतींवर आकर्षक रोषणाई...
पुण्यातील विविध इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला पुण्यातील सगळ्या प्रशासकीय इमारतींवर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. शनिवार वाडादेखील तिरंग्याच्या रंगाने उजळून निघाला. अनेक पुणेकरांनी ही सगळी दृष्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी गर्दी केली होती.
पुण्यातील अंध विद्यार्थ्यांच्या हाताच्या ठश्यांनी साकारला तिरंगा...
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील अंध मुलांच्या शाळेत हाताच्या पंजाचे ठसे उमटवत तिरंगा साकारण्यात आला. कलाविष्कार ड्रॉइंग क्लासेस सहकार नगर पुणेतर्फे क्लासच्या संचालिका गिरिजा कोंडे देशमुख यांच्या संकल्पनेतून हा तिरंगा साकारण्यात आला आहे. भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने यामधे 150 अंध मुलांकडून 30 फुटी भारताचा तिरंगा त्यांच्या हाताचे ठसे उमटवून तयार करण्यात आला.त्यामधे त्यांचे सर्व विद्यार्थी पालक वर्ग आणि परिवारातील सदस्य यांचा सहभाग होता. यातून भारत मातेला एक वेगळ्या प्रकारे सलामी देण्याचा प्रयत्न क्लासच्या संचालिका गिरिजा कोंडे यांनी केलेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :