अहमदनगरमध्ये संवेदनशील संस्थांचा पुढाकार, 10 रुपयात भरपेट जेवण!
एकीकडे मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये अन्नाची नासाडी होते तर दुसरीकडे आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेकजण 1 वेळेच्या जेवणाला देखील मुकतात. हीच बाब लक्षात घेत 'हेल्पिंग हॅन्ड फॉर हंगर्स' या ग्रुपतर्फे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
अहमदनगर : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान 10 रुपयात जेवण देण्याची घोषणा शिवसेनेनं केली होती. या घोषणेची अंमलबजावणी कधी होते हे माहीत नाही. मात्र अहमदनगरमध्ये संवेदनशील संस्थांनी पुढाकार घेत 10 रुपयात भरपेट जेवणाची व्यवस्था केली आहे.
अहमदनगरमधील 'हेल्पिंग हॅन्ड फॉर हंगर्स' या ग्रुपतर्फे 10 रुपयात भरपेट जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सकाळी 11 ते 1 या वेळेत हा उपक्रम राबवला जात असून दिवसभरात तब्बल 150 ते 200 जण याचा आस्वाद घेत. विशेष म्हणजे या थाळीमध्ये सात्विक असं सारभात, खिचडी, पुलाव असे पदार्थ दिले जातात.
एकीकडे मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये अन्नाची नासाडी होते तर दुसरीकडे आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेकजण 1 वेळेच्या जेवणाला देखील मुकतात. त्यामुळे यावर केवळ विचार करत बसण्यापेक्षा कमी पैशात पोटभर जेवण कसं देता येईल, या उद्देशानेच हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. एकीकडे महागाईने उच्चांक गाठलेला असताना 10 रुपयात पोटभर आणि पौष्टिक जेवण मिळत असल्याने नागरिकांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं आहे.
एकीकडे निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी 10 रुपयात जेवण देण्याचे आश्वासन जनतेला दिले. मात्र या आश्वासनाची पूर्तता कधी होणार हा मोठा प्रश्न आहे. मात्र अहमदनगरमधील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन 10 रुपयात जेवण दिल्याने सर्वसामान्य जनातेला एक प्रकारे आधार मिळाला आहे. कल्याणजवळील अंबरनाथमध्येही अशाच प्रकारचा उपक्रम राबवला जात आहे. तेथेही अवघ्या दहा रुपयात भरपेट जेवण दिलं जात आहे.