फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
Sanjivraje Naik Nimbalkar : रामराजे निंबाळकर यांचे धाकटे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आज (14 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून शरद पवारांना साथ देणार आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील शरद पवारांच्या उपस्थितीत फलटणमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता हा पक्ष प्रवेश पार पडेल. रामराजे देखील आमच्याच बाजूने असल्याचा पुनरुच्चार संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे. फलटणमधील अनंत मंगल कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सातारमध्ये अजित पवार गटाला तगडा झटका बसला आहे.
रामराजे निंबाळकर कोणती भूमिका घेणार?
दरम्यान, आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार ते करणार नाहीत. गेले अनेक दिवस रामराजे व आमदार दीपक चव्हाण हे खासदार शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आपण संजीवराजेंच्या पाठीशी ठाम उभा राहणार असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे रामराजे यांनी स्पष्ट केले आहे. रामराजे हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांचा आणखी कार्यकाळ बाकी आहे. तांत्रिक अडचण असल्याने ते तूर्त प्रवेश करणार नाहीत.
दीपक चव्हाणांना फोनवरून उमेदवारी
दुसरीकडे, तुतारी फुंकत असलेल्या आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवारा यांनी फोनवरुन जाहीर केली होती. दीपक चव्हाण फलटण मतदारसंघातून तीनवेळा आमदार झाले आहेत. आता ते चौथ्यावेळी विधानसभेच्या रिंगणात असतील. फलटण मतदारसंघात यावेळी ते विजयी झाल्यास सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंद होईल. कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता रामराजे नाईक निंबाळकर यांनी वेगळा निर्णय घेतल्यास सातारा जिल्ह्याचं राजकारण बदलणार आहे.
शिवस्वराज्य यात्रा आजपासून पश्चिम महाराष्ट्रात
दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आजपासून (14 ऑक्टोबर) बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. यात्रेचा हा शेवटचा टप्पा असेल. या यात्रेची सांगता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या मतदारसंघांमध्ये होणार आहे. सांगता सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, उद्या (15 ऑक्टोबर) विधानसभेसाठी बिगुल फुंकले जाण्याची शक्यता आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 14, 15 आणि 16 तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल.
इतर महत्वाच्या बातम्या