1 मार्चपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर गप्प बसणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनामध्ये तोंड उघडू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. धनंजय मुंडे प्रकरणाबरोबरच अनेक मुद्द्यांवरुन सरकारला घेरणार असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला.
![1 मार्चपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील If Sanjay Rathod did not resign till March 1, then we will not allow the government to speak in the Vidhan Bhavan - Chandrakant Patil 1 मार्चपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/27224129/Chandrakant-Patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : "पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी सोमवारच्या आत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचं रान उठवू," असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. पण उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतील सहा मंत्र्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असताना त्यांच्यावर कुठल्याही स्वरुपाची कारवाई होत नाही, असं ते म्हणाले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्या पतीवरील गुन्हा, मराठा आरक्षण यावरुन सरकारवर टीका केली.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आणि संजय राठोड महाराष्ट्रात मंत्र्यांच्या संबधित अनेक प्रसंग घडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काही बोलत नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सोबतत त्यांनी वानवडी पोलिसांना काही प्रश्नही विचारले. ते म्हणाले की, "वानवडी पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणामध्ये काय सापडलं हे समोर मांडावे. फोनमधील आवाज संजय राठोड यांचा नाही असं पोलिसांना वाटतं का?"
चित्रा वाघ वाघीण आहेत : चंद्रकांत पाटील भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली. चित्रा वाघ यांच्याबद्दल आताच का कारवाई केली जातेय? असा प्रश्न त्यांनी विचारला. परंतु नेत्यांना अशाप्रकारे त्रास देऊन आम्ही घाबरणार नाही. भाजपचे सगळे नेते वाघ यांच्या पाठीशी आहे. त्या आमच्या वाघिणी आहेत, त्या घाबरणाऱ्या नाहीत, असंही ते म्हणाले.
... तर सरकारला तोंड उघडू देणार नाही! मुख्यमंत्री सत्यवादी आहेत, पूजा चव्हाणला न्याय मिळणारच असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. पण उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे." "सोमवारच्या आत राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. वेगवेगळ्या पातळीवर आम्ही आंदोलन करणार आहे," असा इशाराही त्यांनी दिला.
या मुद्द्यांवरुन सरकारला घेरणार : पाटील धनंजय मुंडे प्रकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, वीज बिल या सगळ्या मुद्द्यावरुन सरकारला आम्ही घेरणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोरोना काळात झालेले भ्रष्टाचार हा मुद्दा देखील अधिवेशनात उचलणार आहोत. महाराष्ट्र सरकारने इंधनावर लावलेले कर जास्त आहेत. आम्ही इंधनाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार आहे, असं पाटील पुढे म्हणाले.
सरकार आम्हाला द्या, मराठा आरक्षण टिकवून दाखवतो : चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावरुनही ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आगामी सुनावणीमध्ये तरी सरकार पूर्ण तयारी करुन उतरेल अशी अपेक्षा करुया, असं ते म्हणाले. सोबतच आम्हाला सरकार द्या मराठा समाजाचे आरक्षण टिकवून दाखवतो, असंही त्यांनी नमूद केलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)