लोकांची इच्छा असेल तर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात येणारी लोकसभा निवडणूक लढवेल : हर्षवर्धन जाधव
जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षांपासून रावसाहेब दानवे हे निर्विवाद निवडून येत आहेत. रावसाहेब दानवे हे हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आहेत.

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या सासरा-जावयांचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात आता काही लोकांनी जालना लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. आणि फलक लावल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातील लोकांची इच्छा असेल तर, पंचवीस वर्ष सुरू असलेलं दानवाच्या राज्याचं रूपांतर रामराज्यात आपण करू असं म्हणत थेट येत्या लोकसभा निवडणुकीत सासऱ्यांच्या विरोधातच निवडणुकीत दंड थोपटणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. मग सासऱ्यांविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी आपली घोषणा ते मोडीत काढणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव या ना त्या कारणाने नियमित प्रकाश झोतात असतात. आता ते जालना लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच वाढदिवसानिमित्त लावलेल्या पोस्टरवरून चर्चेत आलेत. जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षांपासून रावसाहेब दानवे हे निर्विवाद निवडून येत आहेत. रावसाहेब दानवे हे हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आहेत. त्यांचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात काही लोकांनी हर्षवर्धन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.
विशेष म्हणजे या फलकावर हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रीण इशा झा यांचादेखील फोटो लावलाय. त्यामुळे ही बाब निश्चित रावसाहेब दानवे यांना खटकणारी आहे. या फोटो विषयी हर्षवर्धन जाधव यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघात दानवेंचं राज्य आहे आणि या राज्याचे रूपांतर रामराज्यात करण्यासाठी आपण या मतदारसंघातून लोकांची इच्छा असेल तर निवडणूक लढवायला तयार आहोत. 
हर्षवर्धन जाधवांच्या या वक्तव्यामुळे पुढची लोकसभा निवडणूक ही सासरे विरुद्ध जावई म्हणजेच हर्षवर्धन जाधव विरुद्ध रावसाहेब दानवे अशी होण्याची चर्चा मात्र सुरू झालेली आहे. हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये घरगुती कुरबुरी सुरू आहेत. मध्यंतरी आपल्यावर दाखल झालेल्या गुन्हे हे आपल्या सासर्यांनी दाखल केल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यांना झालेल्या पुण्यामधील मारहाणीमध्ये देखील रावसाहेब दानवे यांचा हात असल्याचे ते म्हणाले होते. हे वादळ शांत होत नाही तोच आता हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. यावर आम्ही रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. हर्षवर्धन जाधव सासरे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहतील का नाही हे काळच सांगेल. मात्र या बॅनर वरून जालना लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे हे नक्की.























