(Source: ECI/ABP News/ABP Majha)
... तर आत्महत्या करावी लागली असती, तुरूंगातून निवडणूक लढवणाऱ्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
Parbhani News Update : शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याच्या प्रकरणात रासप आमदार रत्नाकर गुट्टे हे 346 दिवस कारागृहात होते. तुरूंगातूनच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.
Parbhani News Update : "जर मी निवडून आलो नसतो तर मला आत्महत्या करावी लागली असती, अशी आपबीती तुरूंगातून निवडणूक लढणाऱ्या आमदाराने मांडली आहे. रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे ( Ratnakar Gutte) यांनी कारागृहात राहून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय देखील मिळवला. परंतु, आज जेलमधूल सुटका झाल्यानंतर डॉय गुट्टे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याच्या प्रकरणात रासप आमदार रत्नाकर गुट्टे हे 346 दिवस कारागृहात होते. कारागृहात राहुनच त्यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. आता याला तब्बल तीन वर्षे उलटल्यानंतर रत्नाकर गुट्टे यांनी आपली आपबिती सांगितली आहे. जर मी निवडून आलो नसतो तर मला आत्महत्या करावी लागली असती, असे वक्तव्य गुट्टे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
परभणीच्या पुर्णा शहरातील राजाराम सभागृहात रासप आणि रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाकडून नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली आपबीती सांगितली. "मतदार हा माझा परिवार आहे. कारण तुम्ही मला जीवदान दिले असून मी जर निवडून आलो नसतो तर मला आत्महत्या करावी लागली असती. त्यामुळे तुम्ही मला जे जीवन दिलंय ते बोनस म्हणून जगतोय. मी माझं सर्वस्व तुमच्यासाठी अर्पण करेल असे गुट्टे यांनी म्हंटले आहे.
Ratnakar Gutte : कोण आहेत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे?
रत्नागकर गुट्टे यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षणानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथील थर्मल प्लांटवर काम करण्यास सुरूवात केली. कामासोबतच त्यांनी आजूबाजूला कोण काय करतंय, कशाप्रकारे व्यवहार चालतात, हे सगळं ते हळूहळू समजून घेत होते. अनेकांशी गोड बोलून त्यानं सगळं शिकून घेतलं. त्यानंतर ते थेट कंत्राटं घेऊ लागले. सुनील हायटेक प्रा. लिमिटेड नावाची त्यांनी कंपनी बनवली आणि देशभरातील वीज प्रकल्पांची कंत्राटं ते घेऊ लागले. पुढे त्यांना साखरेतून पैसा कमावण्याची शक्कल सुचली. गंगाखेडमध्ये त्यांनी साखर कारखाना सुरु केला. ज्याचं उद्घाटन खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्यातच महादेव जानकरांशी जवळीक वाढली आणि गुट्टे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये दाखल झाले. 2014 ला रासपच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली, मात्र, काँग्रेसच्या मधूसुदन केंद्रेंकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटींची कर्ज उचलल्या प्रकरणी जून 2019 मध्ये गुट्टेंना अटक करण्यात आली. परभणीच्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं, मात्र, इथूनच त्यांनी विधानसभेसाठी निवडणुकीचा अर्ज भरला आणि शिवसेनेच्या विशाल कदम यांचा त्यांनी 18 हजार 896 मतांनी पराभव केला.