House Prices Update : मुंबई, पुण्यातली घरं महागली! घरांच्या किमतीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ
House prices update : राज्यातील प्रमुख शहरं असलेल्या मुंबई आणि पुण्यातील घरातील किमतींमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
House prices update : या वर्षात भारतातील घरांच्या किमतीमध्ये सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर राज्यातील दोन प्रमुख शहरं म्हणजेच मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) घरांच्या किंमतींमध्ये प्रत्येकी तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जर आता तुम्हा पुणे, मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आणखी पैसे मोजावे लागणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये घरांची सरासरी किंमत ही प्रतिचौरस फूट 10,100 ते 10,300 रुपये इतकी झाली आहे. तर पुण्यातील घरांच्या किमती या प्रतिचौरस फूट 5,600 ते 5,800 रुपये झाल्या आहेत. देशात रिअल इस्टेट संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. या अहवालामध्ये मुंबई, पुण्यासहित अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, आणि दिल्ली या शहरांचा देखील समावेश आहे.
कोरोनाच्या काळानंतर घरांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच भारतात रिअल इस्टेटमध्ये झालेल्या या वाढीमुळे अनेक सकारात्मक परिणाम होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये व्यवसायिक आणि मोठ्या कंपन्यांकडून मागणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमधील रिअल इस्टेटचा दर्जा सुधारण्यास मदत होत आहे. तर पुढील काही काळामध्ये गृहकर्जाचे दर कमी झाल्यास घरांच्या मागण्या अजून वाढणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
एप्रिल ते जून या कालावधीमध्ये घरांच्या किंमतींमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीमध्ये एकूण 80,250 घरांची विक्री झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा हा मुंबई आणि पुण्याचा आहे. तर यंदा बंगळूरमध्ये नऊ टक्क्यांनी घरांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं चित्र सध्या आहे. बंगळूरमध्ये सध्या घरांच्या किंमती या प्रतिचौरस 6,300 ते 6,500 रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत.
देशातील इतर शहरांतील घरं देखील महागली
राजधानी दिल्लीमध्ये घरांच्या किंमतींमध्ये सहा टक्क्यांनी वाढ होऊन प्रतिचौरस फूट 4,800 ते 5000 रुपयांपर्यंत घरांच्या किंमती पोहचल्या आहेत. तर दिल्लीतील गुरुग्राममधील घरांच्या किंमतींमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुरुग्राममध्ये प्रतिचौरस फूट 7,000 ते 7,200 रुपयांपर्यंत घरांच्या किंमती पोहचल्या आहेत.
हैद्राबादमध्ये घरांच्या किंमतीत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. हैद्राबादमध्ये प्रतिचौरस फूट 6,400 ते 6,600 रुपये घरांच्या किंमती आहेत. चेन्नईमध्येही घरांच्या किंमतींमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या चेन्नईमध्ये घरांच्या किंमती या प्रतिचौरस फूट 5,800 ते 6,000 रुपये आहे. तर कोलकत्यामध्ये घरांच्या किंमतींमध्ये सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोलकत्यामध्ये प्रतिचौरस फूट 4,600 ते 4,800 रुपयांपर्यंत घरांच्या किंमती पोहचल्या आहेत.
हे ही वाचा :
MMRCL Recruitment 2023: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये भरती, नोकरी मिळवण्यासाठी झटपट अर्ज करा