सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न महाग! मालेगावमध्ये राज्यात सर्वाधिक रेडिरेकनरचे दर
Expensive House : नवी मुंबई, ठाणे, पुणे या सर्वाना मागे टाकून मालेगावचे नाव पुढे आल्यानं आश्चर्याचा धक्का बसलाय.
Expensive House : आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न महाग झाले आहे. त्यातही मुंबई-पुण्याच्या (Mumbai) तुलनेत नाशिक (Nashik) मालेगावकरावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे, कारण राज्यात सर्वाधिक रेडिरेकनरचे दर मालेगांवमध्ये (Malegaon) वाढले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक दरवाढ मालेगाव मध्ये
आर्थिक वर्षाच्या सुरवातीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग वार्षिक बाजार मूल्य रेडिरेकनरचे दर जाहीर करत असतो, मागील दोन वर्षात वाढ सुचविली नसल्याने 31 मार्चला सुचविण्यात आलेल्या दरात महाराष्ट्रात सर्वाधिक दरवाढ मालेगाव मध्ये कऱण्यात आलीय. नवी मुंबई, ठाणे, पुणे या सर्वाना मागे टाकून मालेगावचे नाव पुढे आल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. मालेगाव 13.12, नाशिक 12.15, औरंगाबाद 12.38, मुंबई 2.34, ठाणे 7.8, नवी मुंबई 8.90, कल्याण डोंबिवली 7.42 टक्क्यांनी वाढ झालीय. मालेगांव शहराला आकार नाही, शहराची वाढ नियोजन बद्ध नसल्यानं बकाल, अस्वच्छ, मागासलेले शहर हीच मालेगांवची ओळख, मालेगाव शहर यंत्रमाग कामगारांचे शहर असल्यानं कमी क्षेत्रफळात जास्त लोक राहतात. गेल्या काही दिवसात या भागात बांधकामे जास्त आहेत. मागील दोन वर्षात कुठलीही दरवाढ झाली नसल्याने यंदा जास्त दरवाढ झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे, सरकारने रेडिरेकनरचे दर वाढविण्यापेक्षा नागरिक घर घेतील, झोपडपट्टी निर्मूलन होईल, मालेगांवचा बकालपणा दूर होईल, लोकांना सोई सुविधा मिळतील, यासाठी प्रयत्न करणं गरजेच असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
घरांच्या किंमती 10 ते 15 टक्यांनी वाढण्याची शक्यता
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेलेत, पेट्रोल डिझेल पाठोपाठ बांधकाम साहित्यच्या किमती वाढल्यात त्यामुळे घरांच्या किमती आधीच वाढल्यात, नाशिकची रेडिरेकनरची दरवाढ जरी 12.15 टक्के दिसत असली तरी प्रत्यक्षात 20 ते 25 टक्क्यांपेक्षा जास्त छुपी दरवाढ असल्याचा दावा बांधकाम व्यवसायिकाकडून केला जात असल्याने घरांच्या किंमती 10 ते 15 टक्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरकारच्या निर्णयामुळे घरखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांची झोप उडाली आहे. सरकार कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांसाठी परवडणारी घरं जास्तीत जास्त बांधावीत अशी अपेक्षा व्यक्त होतं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: