एक्स्प्लोर
Advertisement
अकलूज बाजारातल्या या घोड्यांची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त
राज्यभर दुष्काळाचे भीषण सावट असूनही अकलूजमध्ये विक्रमी घोडेबाजार भरला आहे. या बाजारात 50 लाखापेक्षा जास्त किमती असणारे घोडे दाखल झाले आहेत.
पंढरपूर : राज्यभर दुष्काळ असूनही अकलूजमध्ये विक्रमी घोडेबाजार भरला आहे. या बाजारात देशातील अत्यंत उच्च प्रतीचे जातिवंत अश्व दाखल झाले आहेत. बाजारात 50 लाखापेक्षा जास्त किमती असणारे तब्बल 26 अश्व बाजारात आल्याने दूरुन खरेदीदार या बाजारात दाखल होऊ लागले आहेत.
पाडव्याच्या मुहूर्तावर खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अकलूजच्या घोडे बाजाराचे उद्घाटन झाले. परंतु उद्घाटनापूर्वीच 176 घोड्यांची विक्री झाली आहे. त्यामधून 2 कोटी 10 लाख रुपयांची उलाढाल या घोडेबाजारात झाल्याचे बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले.
वास्तविक यंदा अधिक महिन्यामुळे एक महिना उशिरा बाजार असल्याने बाजारात अजूनही घोडे दाखल होणे सुरूच आहे. आत्तापर्यंत 2 हजारापेक्षा जास्त जातिवंत अश्व या बाजारात दाखल झाले आहेत. अकलूजच्या घोडेबाजाराचे हे दहावे वर्ष असून आता हा बाजार दर्जेदार अश्वांच्या विक्रीसाठी देशभरात प्रसिद्धीस आल्यानेच देशभरातील व्यापारी आपले घोडे विक्रीसाठी या बाजारात घेऊन येत असतात. पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या परिसरातून हे घोडे अकलूज बाजारासाठी दाखल झाले असून अजूनही मोठ्या प्रमाणात घोडे दाखल होणे सुरूच आहे.
यंदा विक्रमी बाजार भरल्याने आता घोडे लावायलादेखील जागा अपुरी पडू लागली आहे. ५० हजारापासून ते 50 लाखापर्यंत घोडयांना मागणी होताना दिसत असून महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्र, गुजरात, केरळ राज्यातून मोठ्या प्रमाणात खरेदीदार दाखल होऊ लागले आहेत . यंदाच्या बाजारात पंचकल्याणी, काटेवाडी, पंजाब, मारवाड, सिंधी, राजस्थान, गुजराती घोड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.
अलीकडच्या काळात लग्नकार्यात घोडे वारातीसाठी आणि नाचकामासाठी वापरण्याची पद्धत शहरांसोबत ग्रामीण भागातही रूढ झाल्याने व्यवसायासाठी देखील घोडे खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात घोड्यांना चांगला दर मिळू लागला आहे. या बाजारात हौशी मंडळींची संख्याही भरपूर असल्याने आपला शौक पुरवण्यासाठी, तर काही मंडळी आपली पत वाढवण्यासाठी उंची जातीचे दर्जेदार घोडे खरेदीसाठी येत असतात. यात पंचकल्याणी घोड्याच्या शुभलक्षणामुळे भरभराट होत असल्याच्या भावनेतूनही अनेक मंडळी 50 लाखाचे घोडे खरेदी करीत असतात. त्यामुळेच यंदा दाखल झालेल्या घोड्यांमध्ये 26 घोडे हे 50 लाखाच्या पुढच्या किमतीचे आहेत.
उत्तर प्रदेशातील बरेली येथून रुद्र नावाचा 26 महिन्याचा घोडा पहिल्यांदाच बाजारात उतरविण्यात आला असून त्याची किंमत 51 लाख रुपये सांगण्यात येत आहे. जातिवंत मारवाड असलेला रुद्र तेलिया कुम्मेद असून याचे पाय, शेपटी, कान व आयाळ काळ्या रंगाचे तर इतर शरीर डार्क तपकिरी रंगाचे आहे. अतिशय रुबाबदार आणि 64 इंच उंची असलेल्या रुद्र बाजारात सर्वात ऐटबाज घोडा आहे. वयाने लहान असल्याने अजून त्याला ट्रेनिंग देण्यात आले नसले तरी 51 लाखात त्याची विक्री होऊ शकते.
फुरसुंगी येथून आलेले ओम आणि रणसा हे दोन मारवाड जातीची पंचकल्याण अश्वदेखील 50 लाखांपेक्षा अधिक किंमतीचे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement