सेलिब्रेटी महिलेचा फोटो वापरुन दिल्लीच्या डॉक्टरवर हनी ट्रॅप, दोन कोटींची फसवणूक, यवतमाळचा आरोपी जेरबंद
महिला सेलिब्रेटीचा फोटो वापरत दिल्लीच्या डॉक्टरवर हनी ट्रॅप केल्याचा प्रकार समोर आला आहे.महिला बनून जाळ्यात अडकवणाऱ्या यवतमाळच्या आरोपीला पकडले असून तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
यवतमाळ : लोकप्रिय विदेशी महिला सेलिब्रेटीचा फोटो वापरत दिल्लीच्या डॉक्टरवर हनी ट्रॅप केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला बनून जाळ्यात अडकवणाऱ्या यवतमाळच्या आरोपीला पोलीसांनी पकडले असून तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियाचा वापर करुन दिल्लीच्या प्रतिष्ठित डॉक्टरला हनी ट्रॅप द्वारे तब्बल 2 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. महिला बनून डॉक्टरला जाळ्यात अडकविणाऱ्या पुरुष आरोपीला यवतमाळ पोलीसांनी 24 तासात बेड्या घातल्या आहे.
आपण स्मार्ट फोन वापरत असलो तरी बरेच व्यक्ती स्मार्ट फोन वापरण्याइतपत स्मार्ट आहोत काय हे आज तपासून पाहण्याची गरज आज आहे. बरेचदा फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते किंवा स्वीकारली जाते. काहीवेळी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणारी व्यक्ती नेमकी कोण कुठली याची खातरजमा न करता फक्त सुंदर चेहऱ्यावर मोहित होऊन मैत्री करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय दिल्लीच्या एका प्रसिद्ध नामांकित डॉक्टरला यवतमाळमध्ये आला आहे.
दिल्ली येथिल प्रसिद्ध डॉक्टरने 1 वर्षापूर्वी सोशल मीडियावर आलेली एक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर हळूहळू ओळख दाट मैत्रीत बदलली. दरम्यान हनी ट्रॅप करणाऱ्या आरोपी संदेश मानकर याने डॉक्टरला आपल्या बहिणीचे अपहरण झाल्याचे सांगून अपहरणकर्त्यांकडून बहिणीला सोडवण्यासाठी 2 कोटी घेतले आणि पुन्हा काही लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यात डॉक्टरला पाठविण्यास सांगितले.
मात्र एवढी मोठी रक्कम हाती लागल्यानंतर आरोपीने मोबाईल फोनसह सोशल मीडियावरील सर्व अकाउंट बंद केले आणि आता आपण फसलो हे दिल्लीच्या डॉक्टरला लक्षात येताच त्याने यवतमाळ पोलिसात धाव घेतली आणि यवतमाळ पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत 24 तासात आरोपींना जेरबंद केलं आहे.
यवतमाळच्या अरुणोदय सोसायटी येथील एका घरी किरायाने राहणाऱ्या आरोपी संदेश मानकर याला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून तब्बल एक 1 कोटी 72 लाख सात हजार रुपये नगदी व चार लाख रुपयाचे सोन्याचे दागीणे तसेच चार विविध कंपनीचे मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला. आता आरोपीने या अगोदर असेच काही हनी ट्रॅप टाकून कुणाला फसविले काय याचा पोलीस शोध घेत आहेत.
नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येक मीडियाने प्रायव्हसी सेटिंगचा वापर आपण करायला हवा. शिवाय अनोळखी व्यक्तीवर तात्काळ विश्वास ठेवू नये अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.