भिवंडीत होम कोरेन्टाईन संशयितांची नागरीकांना भीती, कारवाई करण्यात प्रशासन अपयशी
भिवंडी तालुक्यातील तब्बल 38 व्यक्ती या परदेशी जाऊन आल्याचे महानगरपालिकेकडून समजत आहे पण अशा व्यक्तींना फक्त होम कोरेन्टाईन करून राहण्याचा सल्ला दिला जातो
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यास आळा घालण्यासाठी परदेशगमन करून आलेल्या व्यक्तीस विलगीकरण केंद्रात ठेवून त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मात्र असे असताना भिवंडी शहरात परदेशगमन करून आलेले सुमारे तीस व्यक्ती आढळून आल्यानंतर सुध्दा त्यांना कोरेन्टाईन केंद्रात न ठेवता त्यांना होम कोरेन्टाईन राहण्याचा सल्ला महानगरपालिका आरोग्य विभाग देत असल्याने अशा व्यक्ती समाजात वावरताना आढळून आल्याने शहरात या व्हायरसचा शिरकाव होण्याची भीती नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.
भिवंडी तालुक्यातील तब्बल 38 व्यक्ती या परदेशी जाऊन आल्याचे महानगरपालिकेकडून समजत आहे पण अशा व्यक्तींना फक्त होम कोरेन्टाईन करून राहण्याचा सल्ला दिला जातो . मिटपाडा, कोंबलपाडा, कामतघर, नायगाव , हनुमान नगर आदी भागात परदेशातून आलेले इसम आढळून आले असता त्यांची माहिती आरोग्य व पोलीस विभागास दिल्यावर त्याची फक्त तपासणी आणि माहिती घेऊन त्यास होम कोरेन्टाईन राहण्याचा सल्ला देऊन सोडून दिले जात आहे. तो राहत असलेला परिसर झोपडपट्टी विभाग असल्याने त्या ठिकाणी तो असा बंदिस्त होऊन राहू शकत नसल्याने अशा संशयित रुग्णांच्या माध्यमातून त्याचा फैलाव जोरात होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी राजेंद्र वरळीकर यांना कळताच त्यांनी महापौर प्रतिभा पाटील यांना कळवून त्या माध्यमातून महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णास ताब्यात घेऊन त्याची रवानगी भिवंडी कल्याण रस्त्यावरील कोरेन्टाईन केंद्रात केली आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव थोपविण्यासाठी अशा व्यक्तींना कोरेन्टाईन केंद्रात हलवून त्यावर आरोग्य विभागाने लक्ष ठेवणे गरजेचे असताना महानगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग त्याबाबत खबरदारी घेत नसल्याबद्दल नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. होम कोरेन्टाईन झालेल्या व्यक्ती स्वतः जबाबदारी घेऊन वागत नसून ते समाजात वावरून या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव करू शकतात. भिवंडी शहरात कोरोना व्हायरसने शिरकाव केला नसून होम कोरेन्टाईन व्यक्ती निष्काळजीपणाने वागत असतील तर ते समाजाचे गुन्हेगार आहेत अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली आहे .
भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, भिवंडी तालुक्यात एकूण 38 नागरिकांना होम कोरेन्टाईन करण्यात आले आहे. त्यापैकी चार जणांना इन्स्टिट्यूशन कोरेन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र असे असताना देखील होम कोरेन्टाईन असताना ही ते परिसरात वावरत असतील तर त्यांना सक्त ताकीद करून घरात राहण्यास सांगितले जाईल. मात्र समजावून देखील ऐकत नसतील तर त्यांना पोलीसांकडून तसेच पालिकेकडून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले . इन्स्टिट्यूशन कोरेन्टाईन सेंटर मध्ये पाठवण्यात येईल तसेच महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी भिवंडीकर यांना घाबरण्याची गरज नाही करण अजून पर्यंत भिवंडीमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झालेला नाही परंतु नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले आहे.
संबंधित बातम्या :
Curfew In Maharashtra | महाराष्ट्रात संचारबंदी, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
Corona Death | मुंबईत कोरोनाचा चौथा बळी, कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Coronavirus | रत्नागिरीत गावातील वाडीच्या वेशीवर 'नो एन्ट्री'चे बोर्ड
Mumbai Corona Patients | कस्तुरबा रुग्णालयातील बारा रुग्ण कोरोनामुक्त, दुसऱ्या चाचणीचे रिपोर्य निगेटिव्ह