Coronavirus | रत्नागिरीत गावातील वाडीच्या वेशीवर 'नो एन्ट्री'चे बोर्ड
रत्नागिरीतील कारवांची वाडी या गावात असलेल्या धनावडे वाडीच्या ग्रामस्थांनी चक्क 'वाडीच्या बाहेरच्या व्यक्तीला परवनागीशिवाय प्रवेश नाही' असा फलकच वेशीवर लावला आहे.
रत्नागिरी : कोरोनाविरुद्धची लढाई आता प्रत्येकाच्या घरात पोहोचल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यांच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. एकंदरीत रविवारचं आणि सोमवारचं चित्र पाहिल्यानंतर कोरोनाबाबत आपण खरंच गंभीर आहोत का? असे सवाल देखील विचारले जाऊ लागले आहेत. नागरिकांनी हे प्रकरण सहजपणे न घेता त्याची गंभीरता ओळखावी असं आवाहन देखील आता शासन, प्रशासनाकडून केले जात आहे. दरम्यान, रत्नागिरीतील कारवांची वाडी या गावात असलेल्या धनावडे वाडीच्या ग्रामस्थांनी चक्क 'वाडीच्या बाहेरच्या व्यक्तीला परवनागीशिवाय प्रवेश नाही' असा फलकच वेशीवर लावला आहे. शिवाय, त्या ठिकाणी पाणी आणि साबणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. वाडीबाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परवानगी आवश्यक आहे. शिवाय, हात धुणं देखील गरजेचं आहे. त्याशिवाय प्रवेश नाही असा फलक येथे लावण्यात आला आहे. या स्तुत्य उपक्रमाची चर्चा आता जोरात सुरु झाली आहे. आता प्रत्येकाने असाच उपक्रम राबवावा असं आवाहन देखील गावचे पोलीस पाटील करत आहेत.
'कोरोनाला संपवणार' कोरोनावर मात करणं गरजेचं आहे. त्याला हरवण्यासाठी आम्ही तयार आहोत. किराणा माल देखील आणायला जाताना वाडीतील व्यक्ती कल्पना देते आणि बाहेर जाते. ही लढाई आमची आहे. आम्ही कोरोनाला हरवणार. जोवर कोरोना कायमचा संपत नाही तोवर आम्ही असे फलक लावणार आणि त्याची अंमलबजावणी करणार. शासन आणि प्रशासनाला आम्ही कायम साथ देणार, अशी प्रतिक्रिया गावातील नागरिक देत आहेत.
जिल्ह्यात सध्या काय स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात सध्या तरी एकच कोरोनाबाधित रुग्ण आहे. त्याची देखील प्रकृती सुधारत असून ती ठणठणीत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या पत्नीचे आणि भावाचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. शिवाय, उर्वरित 15 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील सुरळीत सुरु असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे.