नांदेड येथे शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर हल्ला, चार पोलीस गंभीर तर 10 जखमी
नांदेड येथे हल्ला मोहल्ला हल्लाबोल कार्यक्रमादरम्यान पोलिसांवर हल्ला झाला. यात चार पोलीस गंभीर तर 10 जखमी झालेत. हल्ला मोहल्ला मिरवणूक काढू न दिल्यामुळे पोलिसांवर हल्ला करण्यात आला.
नांदेड : नांदेड येथे शीख समाजाच्या हल्ला मोहल्ला कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात दंगा झाला आहे. सदर दंगलीत चार पोलीस कर्मचारी गंभीर तर दहा जण अत्यवस्थ आहेत. हल्ला मोहल्ला कार्यक्रम काढू न दिल्यावरून पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह सात वाहनांची दंगेखोरांनी नासधूस केली आहे. पोलीस अधीक्षक यांचे दोन गार्ड या दंगलीत जखमी झालेत. तर त्या ठिकाणी सदर घटनेचे चित्रीकरण करत असणाऱ्या व्यक्तीचे तीस ते चाळीस मोबाईलही फोडण्यात आलेत. तसेच पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तासह गुरुद्वारा परिसरात लावण्यात आलेले सर्व बॅरिगेट्स तोडण्यात आलेत.
शीख समाजात होळी या सणाला मोठे महत्त्व आहे. त्यानिमित्त शीख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्ला बोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु, यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नव्हती. तसेच संबंधित हल्ला मोहल्ला कार्यक्रम हा पूजा अर्चा करून साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते व त्यास शीख धर्मियांच्या बाबाजींनी सकारात्मक प्रतिसादही देण्यात आला होता. मात्र, या दरम्यान सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यातील काही तरुणांनी सदर हल्ला मोहल्ला कार्यक्रमात पोलीस प्रशासनाला न जुमानता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली.
Maharashtra: 4 Police personnel injured after some Sikh youth broke gates of Gurudwara in Nanded & allegedly attacked them. SP says, 'Permission for Hola Mohalla wasn't granted due to #COVID19. Gurudwara committee was informed & they'd said that they would do it inside Gurudwara" pic.twitter.com/clOBTQBb9F
— ANI (@ANI) March 29, 2021
यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान हल्ला मोहल्ला कार्यक्रमातील तरुणांनी पोलीसांशी हुज्जत घातली व हल्ला चढवून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर पोलीस अधीक्षकांच्या गाडीसह पोलिसांच्या इतर सात वाहनांची नासधूस व तोडफोड केली. तर काही माथेफिरू लोकांनी बॅरिकेटिंगही तोडली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. नांदेडमध्ये दररोज कोरोनाचे एक हजारहून अधिक रुग्ण आढळत असून 17 ते 18 जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गुरुवारपासून टाळेबंदी करण्यात आली आहे. परंतु, त्यानंतरही आज शीख समाजाच्यावतीने हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यात 10 पोलीस जखमी झाले. संतप्त जमावाने पोलीस उपअधीक्षक यांची गाडीही फोडली. चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाइल यावेळी फोडण्यात आले आहे.